पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया आघाडीचा दारूण पराभव होणार आहे. पहिल्या टप्प्यातच विरोधकांना मतदारांनी नाकारलं असून पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान झाले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ४ जूननंतर विरोधक एकमेकांचे कपडे फाडतील. राहुल गांधींना अमेठी मतदारसंघ सोडावा लागला, वायनाड मतदारसंघाबाबतही त्यांना खात्री नाही, असा टोला त्यांनी लगावला. शनिवारी (दि. २०) नांदेड येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थीत होते.
नांदेड येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी '२० एप्रिलची तयार झाली का?' असा मराठीतून प्रश्न विचारत भाषणाला सुरूवात केली. मोदी म्हणाले की, देशात शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. ज्यांनी मतदान केले त्या सर्वांचे, विशेषत: पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मतदानानंतर बूथ स्तरापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेले विश्लेषण आणि मिळालेली माहिती यावरून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान झाले आहे. आपला भ्रष्टाचार वाचवण्यासाठी इंडिया आघाडीचे लोक स्वार्थासाठी कसे एकत्र आले आहेत, हे मतदारही पाहत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडिया आघाडीला पूर्णपणे नाकारल्याचे वृत्त आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
'वायनाडमध्ये राहुल गांधींसमोर संकट'
येणारी २५ वर्षे ही जगातील भारताच्या महानतेची वर्षे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करणे ही आपली लोकशाही ताकद दाखवते. या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या लोकांना उमेदवारी मिळत नाही, अशी परिस्थिती अशी आहे. त्यांचे नेते बहुतांश जागांवर प्रचाराला जात नाहीत. काँग्रेसच्या राजपुत्रालाही (राहुल गांधी) वायनाडमध्ये संकट दिसत आहे. शहजादे आणि त्यांचा गट २६ एप्रिल रोजी वायनाडमध्ये मतदानाची वाट पाहत आहेत. २६ एप्रिल रोजी मतदान पूर्ण होताच राजकुमारासाठी (राहुल गांधी) दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
गरीब, दलित, वंचित, मजूर, शेतकरी यांच्या विकासासमोर काँग्रेस नेहमीच भिंत बनून उभी राहिली आहे. एनडीए सरकारने गरिबांसाठी कोणतेही काम केले तर काँग्रेस खिल्ली उडवते. महाराष्ट्राचा आणि विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास अनेक दशकांपासून थांबविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसच्या वृत्तीमुळे येथील शेतकरी गरीब झाला, उद्योगधंद्यांशी संबंधित शक्यता मावळू लागल्या, लाखो तरुणांना स्थलांतर करावे लागले.
हेही वाचा :