पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार पूर्वीच तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून त्याचा अवलंब केला होता. ही घटना आहे 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील. 11 एप्रिल रोजी उधमपूरमधील सैला तालाब मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती. नरेंद्र मोदी जनतेपुढे भाषण करणार होते.
सायंकाळी सातच्या सुमारास मंचासमोरील पडदा वर गेला आणि निळ्या रंगाचे टेबल-खुर्ची दिसू लागली. काही मिनिटांतच मोदी थ्रीडी स्वरूपात अवतरले. त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. नंतर सुमारे तासभर त्यांनी भाषण केले. एकदाही असे वाटले नाही की, मोदी अन्य कोठून भाषण करत असून, केवळ त्यांची छबी समोर दिसत आहे. त्यावेळी या थ्रीडी तंत्रज्ञानाने लोकांना आश्चर्यचकित केले होते.
भाषणादरम्यान मोदी दोन-तीन वेळा ग्लासभर पाणीही प्यायले. सभा संपताच त्यांनी उपस्थितांना 'भारत माता की जय' अशा घोषणाही द्यायला लावल्या. उधमपूरमध्ये या तंत्रज्ञानाची बरेच दिवस चर्चा होती. एकाच दिवशी अशा पद्धतीने मोदी यांनी तेव्हा देशातील शंभर ठिकाणी सभा घेतल्या होत्या.