Latest

Virat vs Sachin : ६ धावा काढून विराट मोडणार सचिन तेंडूलकरचा ‘हा’ विक्रम!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat vs Sachin : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. कोरोना संर्गामुळे मालिकेतील तीनही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. या मालिकेनंतर उभय संघांमधील टी २० मालिका कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर खेळली जाणार आहे.

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ धावा केल्यास तो सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम मोडीत काढेल. ३३ वर्षीय विराट भारतीय भूमीवर ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरणार आहे. त्याच्या आधी फक्त सचिन तेंडूलकरनेच भारतासाठी अशी कामगिरी केली आहे. तेंडूलकरने भारतीय भूमीवर १६४ सामन्यांच्या १६० डावांमध्ये ६,९७६ धावा केल्या आहेत. (Virat vs Sachin)

सचिनने भारतीय भूमीवर १२१ डावांत ५००० धावा पूर्ण केल्या. दुसरीकडे विराट कोहलीने आतापर्यंत भारतीय भूमीवर ९८ सामने खेळले असून त्याने ९५ डावांत ४९९४ धावा केल्या आहेत. आता त्याला ५००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ६ धावांची गरज आहे. ९६ व्या डावात तो ही कामगिरी पार पाडेल अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीने तेंडूलकरचा विक्रम मोडला होता. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९ वी धावा काढताच तो भारताबाहेर प्रतिस्पर्धी संघांच्या मायदेशात सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला. सचिनने भारताबाहेर प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानात १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ५,०६५ धावा केल्या आहेत. द. आफ्रिका दौ-यातील पहिल्या वनडेत विराटने डावातील २७ वी धाव पूर्ण केली तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. विराटने सौरव गांगुली (१,३१३) आणि राहुल द्रविड (१३०९) यांनाही मागे टाकले. (Virat vs Sachin)

६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कोहलीने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडले. यापूर्वी त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. दरम्यान, विश्वचषकानंतर कोहलीने टी-२० विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले. कर्णधारपदावरून रोहित शर्मा आणि कोहली यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ड्रेसिंगरूमधील वातावरण कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Virat vs Sachin)

SCROLL FOR NEXT