भुवनेश्वर; वृत्तसंस्था : हॉकी वर्ल्डकप 2023 च्या ग्रुप डी मधील भारत विरूद्ध इंग्लंड सामना 0 – 0 असा बरोबरीत संपला. इंग्लंडने भारताचे आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावत एकही गोल होऊ दिला नाही. भारताला गोल करण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या. मात्र संधीचे गोलमध्ये रूपांतरित करण्यात अपयश आले. सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यामुळे ग्रुप डी मधून थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्याची दोन्ही संघाना संधी असणार आहे. (Ind vs Eng Hockey WC)
भारताचा पुढील सामना 19 जानेवारी होणार आहे. या सामन्यात भारताला वेल्स संघाचे आव्हान असणार आहे. उप-उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी या सामन्यात टीम इंडियाला विजय आवश्यक असणार आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये इंग्लंडने चेंडूचा ताबा आपल्याकडे ठेवत भारतावर दबाव निर्माण केला. मात्र दोन पेनाल्टी कॉर्नर मिळूनही त्यांना गोल करता आला नाही. (Ind vs Eng Hockey WC)
दुसर्या क्वार्टरमध्येही भारताने इंग्लंडला पेनाल्टी कॉर्नर देण्याचा सपाटा लावला. मात्र इंग्लंडला भारतावर गोल करता आला नाही. त्यामुळे पहिला हाफ 0 – 0 असा गोलशून्य बरोबरीत राहिला. तिसर्या क्वार्टरच्या सुरूवातीलाच इंग्लंडच्या गोलकिपरने हार्दिकचे आक्रमण परतवून लावले. मनदीपलाही तिसर्या क्वार्टरच्या शेवटच्या काही मिनिटात गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याचा फटका ऑफ द टार्गेट गेला.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला एक धक्का बसला जरमनप्रीत सिंगला ग्रीन कार्ड दाखवल्याने त्याला दोन मिनिटांसाठी बाहेर जावे लागले त्यामुळे भारताला एक खेळाडूविनाच खेळावे लागले. तरी देखील इंग्लंडला गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे सामना गोलशून्य असा बरोबरीत सुटला. इंग्लंडने चौथ्या क्वार्टरमध्ये भारतावर गोल करण्यासाठी चांगल्या चढाया केल्या मात्र त्यांना अपयश आले.
हेही वाचा;