IND vs SL : भारताचा सर्वात मोठा विजय; श्रीलंकेला तिसर्‍या वन-डेत तब्बल ३१७ धावांनी हरवले | पुढारी

IND vs SL : भारताचा सर्वात मोठा विजय; श्रीलंकेला तिसर्‍या वन-डेत तब्बल ३१७ धावांनी हरवले

थिरुवनंतपुरम; वृत्तसंस्था : एकदिवसीय सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद करताना भारताने श्रीलंकेला तब्बल 317 धावांनी हरवले. यापूर्वी न्यूझीलंडच्या नावावर सर्वात मोठ्या विजयाची नोंद होती. त्यांनी आयर्लंडला 290 धावांनी हरवले होते. या विजयाबरोबरच भारताने एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला. (IND vs SL)

थिरुवनंतपुरम येथे झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताच्या विराट कोहली (नाबाद 166) आणि शुभमन गिल (116) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 5 बाद 390 धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद सिराजने 4 विकेटस् घेत श्रीलंकन फलंदाजांचे कंबरडेे मोडले. श्रीलंकेचा डाव 22 षटकांत 9 बाद 73 धावांवर थांबला. अशेन बंडारा हा जखमी झाल्यामुळे फलंदाजीला आला नाही. (IND vs SL)

भारताचे 391 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने असलंका फर्नांडोला 1 तर कुसल मेंडिसला 4 धावांवर बाद करत पहिले दोन धक्के दिले. त्यानंतर मोहम्मद शमीने चरिथ असलंकला 1 धावेवर बाद करत लंकेची अवस्था 3 बाद 31 धावा अशी केली. सिराजने लंकेला अवघ्या 4 धावांत चौथा धक्का दिला. त्याने नुवानिदू फर्नांडोचा 19 धावांवर त्रिफळा उडवत लंकेची 8 व्या षटकात 4 बाद 35 धावा अशी अवस्था केली. त्यानंतर कुलदीप यादवनेही लंकेला धक्के दिले. शेवटी त्यांचा डाव 73 धावांवर थांबला. (IND vs SL)

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी नोंदवली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आपल्या अर्धशतकाला मुकला आणि 42 धावांवर बाद झाला. हिटमॅनने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव टाकला होता, पण पाहुण्या संघाने पुनरागमन करताना चमिका करुणारत्नेने रोहितला बाद करून श्रीलंकेच्या चाहत्यांना जागे केले. शॉर्टबॉलवर षटकार मारताना तो नेहमीप्रमाणे डिप मिडविकेटवर जाळ्यात अडकला, पण शुभमन गिलने एका बाजूने धावसंख्या वाढवत नेली. त्याला किंग कोहलीने चांगली साथ दिली.

शुभमन गिलने 97 चेंडूंत 116 धावांची शतकी खेळी केली आणि भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. 14 चौकार आणि 2 षटकारांच्या गिलच्या खेळीला कसुन रजिथाने ब्रेक लावला आणि भारताला दुसरा झटका दिला. गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर खेळपट्टीवर आला त्याने संयमी खेळी करून किंग कोहलीला साथ दिली. विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील शतक ठोकून इतिहास रचला होता. गिलपाठोपाठ विराट कोहलीनेही 85 चेंडूंत शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याचे 74 वे शतक ठरले आहे. तर वन-डे मधील हे 46 वे शतक आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी किंग कोहली आणखी 3 शतकी खेळीपासून दूर आहे. कारण वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सचिनने सर्वाधिक 49 शतके झळकावली आहेत.

शतकानंतर मात्र विराटने एकट्यानेच फटकेबाजी केली. कारण, दुसर्‍या बाजूला आलेले के.एल. राहुल (7) आणि सूर्यकुमार यादव (4) हे लगेच बाद झाले. 106 चेंडूंत विराटने दीडशेचा टप्पाही गाठला. शेवटी तो 166 धावांवर नाबाद राहिला. 85 चेंडूत शतक झळकावणारा विराट 110 चेंडूंत 166 धावांवर पोहोचला होता, म्हणजेच त्याने शेवटच्या 25 चेंडूंत 66 धावा चोपल्या. अक्षर पटेल 2 धावांवर नाबाद राहिला. हार्दिक पंड्या व उमरान मलिक यांना तिसर्‍या सामन्यात विश्रांती दिली गेली असून त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर व सूर्यकुमार यादव यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवले, पण यादव लवकर बाद झाला, तर सुंदरला फलंदाजी मिळालीच नाही.

तिसर्‍या वन-डे सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी शुभमन गिलने कर्णधार रोहित शर्मासह सलामीला जबरदस्त खेळी केली. दोघांमध्ये 96 धावांची भागीदारी झाली, पण रोहित 42 धावांवर बाद झाला. गिल मात्र क्रीझवर कायम राहिला आणि त्याने झटपट आपले शतक पूर्ण केले. शुभमन गिलने सुरुवातीपासून ताबडतोब खेळी करून डावाची सुरुवात केली. त्याने एकाच षटकांत 4 चौकार ठोकून आपले लक्ष्य दाखवून दिले होते. त्याने 2 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 89 चेंडूंत 100 धावांची शतकी खेळी केली. खरं तर शुभमन गिलचे वन क्रिकेटमध्ये मायदेशातील हे पहिलेच शतक आहे.

31 व्या षटकातील सहाव्या चेंडूवर विराटने शुभमन गिलला स्ट्राईक दिला. गिलने या षटकाचा शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला आणि एक धाव घेतली आणि एकदिवसीय क्रिकेटमधील आपले दुसरे शतकही झळकावले. गिलने हे शतक केवळ 89 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले.

गिलने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध आपले वन-डेमधील पहिले शतक झळकावले होते. याशिवाय गेल्या महिन्यात बांगला देश दौर्‍यावरही त्याने पहिले कसोटी शतक झळकावले होते.

विराटचा सुपर शो; 4 डावांत 3 शतके

विराट कोहलीला 72 व्या शतकासाठी जवळपास दोन-अडीच वर्षे वाट पाहावी लागली. मात्र, विराटने हा शतकांचा दुष्काळ संपवला अन् शतकांची बरसातच होऊ लागली आहे. विराट कोहलीने गेल्या चार डावांत तब्बल 3 शतकी खेळी करत शतकांची पंचाहत्तरी पार करण्याच्या जवळ पोहोचला आहे.

विराटने आपले 72, 73 आणि 74 वे आंतरराष्ट्रीय शतक हे अवघ्या 4 डावांत ठोकले. याचबरोबर विराट कोहलीने मायदेशात सर्वाधिक वन-डे शतके ठोकण्यातही सचिन तेंडुलकरला मागे टाकले. विराट कोहलीची आता भारतात 21 वन-डे शतके झाली आहेत.

शेवटच्या चार वन-डे इनिंग

91 चेंडूंत 113 धावा
87 चेंडूंत 113 धावा
9 चेंडूंत 4 धावा
110 चेंडूंत नाबाद 166 धावा

अनेक विक्रमांना गवसणी

विराट कोहलीने 74 व्या शतकी खेळीनंतर अनेक विक्रमांना आणि माईल स्टोनला गवसणी घातली आहे.

सर्वाधिक वन-डे धावा

सचिन तेंडुलकर 452 डावांत 18426 धावा
कुमार संगकारा 380 डावांत 14234 धावा
रिकी पाँटिंग 365 डावांत 13704 धावा
सनथ जयसूर्या 433 डावांत 13430 धावा
विराट कोहली 259 डावांत 12651 धावा

हेही वाचा; 

Back to top button