Latest

विशाळगड (भोसलेवाडीस) प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा

निलेश पोतदार

विशाळगड : सुभाष पाटील  विशाळगड भोसलेवाडी येथे २०२१ च्या अतिवृष्टीत डोंगराला मोठ्या भेगा पडल्या होत्या. डोंगर खचण्याची भीती निर्माण झाल्याने १२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. येथील कुटुंबे सध्या भीतीच्या छायेखाली आली आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने प्रशासनाने देखील गंभीर दखल घेत त्या १२ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा महसूल विभागमार्फत दिल्या आहेत.

शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगड येथील भोसलेवाडी परिसरात २०२१ मध्ये अतिवृष्टी काळात जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. तत्कालीन प्रांताधिकारी अमित माळी व तहसीलदार गुरू बिराजदार यांनी यावेळी पाहणी करून शासनास अहवाल सादर केला होता. त्यावेळी येथील कुटुंबाचे स्थलांतर गजापूर गावात करण्यात आले होते. यावेळी जमिनींना २ ते ३ फुटांच्या भेगा पडून भोसलेवाडी डेंजर झोनमध्ये आली होती. गतवर्षी खचणाऱ्या डोंगराचे सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करण्यात आले. त्यांनी आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केला आहे. जिल्ह्यात धोकादायक गावांच्या यादीत ७६ गावे आहेत. यामध्ये विशाळगड (भोसलेवाडी) चा समावेश आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

नुकतीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे डोंगर खचून मोठी आपत्ती ओढवली. अनेकांचा जीव या आपत्तीत गेला आहे. इर्शाळवाडी येथे डोंगर खचल्यानंतर विशाळगड भोसलेवाडी येथील रहिवाशांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला आहे. येथील ग्रामस्थांनी खचणाऱ्या डोंगराबाबत वारंवार प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आता तर अतिवृष्टीची भीती असून, अतिवृष्टी झाल्यास भूस्खलन होईल अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रात्र जागून काढण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

येथील १२ घरे डोंगरानजीक आहेत. यातील काही घरांना २०२१ साली तडेही गेले होते. काही ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले की, २०२१ मध्ये पहिल्यांदाच येथील परिसरात डोंगर खचायला सुरूवात झाली. जमिनींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या. परिस्थिती जैसे थे असून भविष्यात अतिवृष्टी झाल्यास मोठ्या भेगा पडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत येथील तलाठ्यांकडे संपर्क केला असता, १२ कुटुबांना स्थलांतर होण्याच्या नोटीसा दिल्या असल्याची माहिती तलाठी घनश्याम स्वामी यांनी दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT