Latest

नाशिकमध्येही कुत्तागोलीची नशा ; अल्पवयीन मुलांकडून खरेदी, काय आहे कुत्तागोली?

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'अल्प्राझोलम' अर्थात 'कुत्तागोली' मालेगावमध्ये सर्रास विकली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता नाशिकमध्येही या गोळीची सर्रास विक्री होत असून, अल्पवयीन मुले नशेसाठी या गोळीचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवघ्या काही रुपयांत ही गोळी मिळत असल्याने, 'कोणीही यावे अन् खरेदी करावे' असेच काहीसे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.

सिडकोतील एका मेडिकलमध्ये कुत्तागोलीची सर्रास विक्री केली जात असल्याचे समोर आल्यानंतर शहरातील अन्य मेडिकलवरदेखील ही गोळी विकली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बालगुन्हेगारांसह 18 ते 20 वर्षे वयोगटातील काही तरुणांकडून या गोळीची नशा केली जाते. त्याचबरोबर गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीही गोळीचे सेवन करून गुन्हा करीत असल्याचे पोलिसांच्या बर्‍याचदा निदर्शनास आले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही गोळी विकली जात असल्याने, अल्पवयीन मुलांकडून ही गोळी सहज खरेदी केली जाते. दरम्यान, शहरातील अनेक मेडिकलवर ही गोळी विकली जात असल्याचा संशय असून, अन्न व औषध प्रशासनाकडून झडती सत्र राबविले जाणार आहे.

काय आहे कुत्तागोली?
या गोळीचे नाव अल्प्राझोलम आहे. काही उत्तेजक पदार्थांपासून या गोळीची निर्मिती केली जाते. गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होत असल्याने, नशा केल्याचा भास होतो. मात्र, या गोळीचे अतिसेवन शरीरास घातक असून, त्यामुळे मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता असते. या गोळीचा मेंदूवरही विपरीत परिणाम होतो. या गोळीच्या सेवनाने आयुष्यमानही घटते. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र, काही मेडिकल स्टोअर्स या गोळ्या सर्रासपणे विकतात.

गुजरात, उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात
ही गोळी छुप्या मार्गानेही महाराष्ट्रात आणली जाते. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतून ही गोळी महाराष्ट्रात आणली जात असल्याचे बर्‍याचदा समोर आले आहे. या गोळीची व अँडिसिव्ह बॉण्डची किंमत 25 ते 60 रुपये, तर झिंग आणणार्‍या नशिल्या लिक्विड औषधाची किंमत 80 ते 100 रुपये इतकी आहे. कमी किमतीत नशा होत असल्याने या अमली पदार्थाचा ट्रेंड राज्यातील सीमावर्ती नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, पालघर, ठाणे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती आदी मध्यम व छोट्या शहरांतील झोपडपट्टी भागात जोरात आहे.

असोसिएशनच्या सर्व सभासदांना कुत्तागोलीचे दुष्पपरिणाम सांगितले आहेत. शिवाय डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळीची विक्री करू नये, याबाबतच्याही सूचना दिल्या आहेत. मालेगावमध्येदेखील एकाही मेडिकलवर कुत्तागोलीची विक्री होत असल्याचे समोर आलेले नाही. बाहेरून आलेल्या मेडिकल स्टोअर्सला नियमच नसल्याने, अशा प्रकारच्या गोळ्यांची विक्री केली जाते. ऑनलाइन साइटवर तर त्याची सर्रास विक्री होते.
– गोरख चौधरी, अध्यक्ष,
केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

सिडकोतील एका मेडिकलमध्ये कुत्तागोली विकली जात असल्याचे निर्दशनास आल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावली आहे. नोटिसीचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची किंवा परवाना रद्दची कारवाई केली जाऊ शकतो. त्याचबरोबर वरिष्ठांशी चर्चा करून इतरही मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या विनाचिठ्ठी ही गोळी विकली जातेय काय? याची तपासणी केली जाणार आहे.
– दीपक मालपुरे, औषध निरीक्षक,
अन्न व औषध प्रशासन

शहरात बहुतांश मेडिकलवर या गोळीची विक्री केली जात आहे. त्याचा छडा लावण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे असून, त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचे काम ही नशा करीत असून, स्वस्तात उपलब्ध होत असल्याने अल्पवयीनदेखील या नशेला बळी पडत आहेत. प्रशासनाने मेडिकलवर कारवाई करावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करू.
– अजिंक्य गिते, युवक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT