मिनी ऑलिम्पिक पुण्यात होणार | पुढारी

मिनी ऑलिम्पिक पुण्यात होणार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 च्या आयोजनास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित केली जाणार असून या स्पर्धेत 32 विविध क्रीडा प्रकार असून, नऊ हजारांहून अधिक खेळाडू, अधिकारी, पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर, अ‍ॅड. धनंजय भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंदे, संजय शेटे, क्रीडा आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य शासन यांच्या संयुक्‍त विद्यमाने होणार असून राज्य शासनाने 19 कोटी 7 लक्ष 94 हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्पर्धेच्या सुनियोजित व यशस्वी आयोजनासाठी समिती गठित केल्या जाणार आहेत.

राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या वतीने आयोजित होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये खेळल्या जाणार्‍या 32 विविध क्रीडा प्रकारांत होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद हे पुणे जिल्ह्याला मिळाले असून, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे-बालेवाडी हे स्पर्धेचे मुख्य ठिकाण आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या क्रीडा संकुलामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

अठरा जून रोजी सर्वसाधारण सभा

ऑलिम्पिक डे हा राज्यातील महसूल विभागस्तरावर तसेच जिल्हा स्तरावर महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने भव्य स्वरूपात साजरा करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18 जून रोजी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. ऑलिम्पिक संघटनेच्या विविध समित्यांचे गठन करण्याचेही ठरविण्यात आले.

प्रथमच ऑलिम्पिक जलक्रीडा प्रकारांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूपर्यंत ऑलिम्पिक चळवळ पोहोचेल. स्पर्धेचे आयोजन हे राज्याच्या क्रीडा संस्कृतीशी साजेशे दर्जेदार करा.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा
असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन.

Back to top button