Latest

इंदोरीकर महाराजांना लसीचे महत्त्व पटवून देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

रणजित गायकवाड

मी स्वतः कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही असे वक्तव्य करणा-या निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. या वक्तव्याप्रकरणी राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

बारामतीत बुधवारी (दि. ३) ते पत्रकारांशी बोलत होते. निवृत्ती महाराज देशमुख यांनी लसीकरणाविरोधात नुकतेच वक्तव्य केले. मी स्वतः लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही असे ते नाशिकमध्ये एका किर्तनात म्हणाले. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले.

ना. टोपे म्हणाले, प्रबोधनकार-किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत. ते ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्की बोलने. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे किर्तनावर बंधने होती. आता किर्तने सुरु झाली आहेत. महाराजांचे व माझे प्रेमाचे, विश्वासाचे संबंध आहेत. महाराजांनी स्वतःला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सींग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.

जागतिक स्तरावर कोविड लसीला महत्त्व आहे. लस ही कवचकुंडल आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होत नाही असे नाही, परंतु लस घेतल्यावर रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत नाही, त्याला आॅक्सिजनची गरज भासत नाही, आयसीयूमध्ये दाखल करावे लागत नाही. लसीमुळे लसीमुळे शरीरामध्ये अॅंटीबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे लस घेणे गरजेचे आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून मी त्यांना समजावून सांगेन, जेणेकरून त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनाही त्यांनी लस घ्यावी असे आवाहन केले पाहिजे. काही समाजामध्ये लसीबाबत गैरसमज आहेत. त्यांच्या धर्मगुरुंशी आम्ही बोलून लसीची उपयुक्तता पटवून दिली आहे. इंदूरीकरांनाही मी लक्ष घालून यासंबंधी निश्चित सांगेन.

राज्यात सात कोटी नागरिकांना मिळाला पहिला डोस

लसीकरणासंबंधी केंद्र व राज्याच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असल्याच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात सात कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर तीन कोटी नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. संबंध राज्याच्या उद्दिष्टाच्या ७३ टक्के तर दुसऱया डोसचे ३४ टक्के लसीकरण झालेले आहे.

केंद्र व राज्याच्या आकडेवारीत जर काही फरक असेल तर जुळवणी करण्याचे काम केले जाईल. को-विन अॅपवर अत्यंत पारदर्शीपणे अपडेटेड डेटा असतो. त्याला डेटाच्या अनुषंगानेच आकडेवारी तयार होते. कोविडच्या काळात आकड्यांबाबत कधीही चुकीची माहिती आम्ही दिलेली नाही. रुग्णांचे आकडे असोत कि मृत्यूचे असोत की आता लसीकरणाचे असो. पारदर्शकता आणि प्रामाणिकता हा आमचा मूल सिद्धांत राहिला आहे. त्यामुळे आमचे आकडे नेहमीच बिनचूक असतात. त्यात कुठेही दिशाभूल कऱण्याचा विषय येत नाही असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT