Latest

शिवसैनिकांच्या वाट्याला कोणी आलं, तर सोडणार नाही, एकनाथ शिंदेंचा इशारा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अडीच वर्षात शिवसैनिकांनी खूप काही भोगलं. त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. मात्र, आता या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. एकाही शिवसैनिकाचा बालबाका करून देणार नाही. शिवसैनिकांच्या वाट्याला कोणी आलं, तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१२) दिला. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहासमोर समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिंदे बोलत होते.

आमदार संतोष बांगर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या संतोष बांगर यांनी आज मुंबईतील सह्यादी अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मी मुख्यमंत्री नाही, तर तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात. मागील अडीच वर्षात शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षामुळे शिवसेनेच्या मतदारसंघातील आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सावरकर, दाऊद, हिंदुत्व आदी मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमुळे उघडपणे भूमिका घेता येत नव्हती. त्यामुळे शिवसेनेतील ४० आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील युतीचे सरकार बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारावर पुढे जात आहे.

संतोष बांगर एक कार्यतत्पर आमदार असून सर्वसामान्य जनतेच्या सुखदु:खात धावून जातो. त्यांची हिंगोली जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली असली तरी आजही तेच जिल्हा प्रमुख आहेत, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT