पुढारी ऑनलाईन डेस्क : रॅचेल हेन्स (४३) आणि अॅलिसा हिली (७२) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेली १२१ धावांची भागिदारी, आणि त्यानंतर मेग लॅनिंग हिने फटकावलेल्या ९७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने टीम इंडियावर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह कांगारू संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर टीम इंडियाला विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील दोनही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकांत ४ गडी गमावून २८० धावा करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगला तिच्या ९७ धावांच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीच्या षटकांमध्ये त्यांचा निर्णय योग्य ठरवला. भारताच्या दोन्ही सलामीवीर स्मृती मानधना (१०) आणि शफाली वर्मा (१२) झटपट बाद झाल्या. या दोघींना डार्सी ब्राउनने माघारीचा रस्ता दाखवला. त्यानंतर यस्तिका भाटिया आणि कर्णधार मिताली राज यांनी संघाचा दाव सांभाळला आणि त्यांनी शतकी भागीदारी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. यास्तिका ५९ आणि मिताली ६८ धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा मधल्या फळीत चमकदार फलंदाजी केली आणि ५७ धावा करत शेवटपर्यंत नाबाद राहिली. पूजा वस्त्राकरनेही ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अशा प्रकारे भारताने ५० षटकात ७ गडी गमावून २७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने ३ बळी घेतले.
२७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. रॅचेल हेन्स आणि अॅलिसा हिली या जोडीने पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. हेन्स ४३ धावांवर बाद झाली आणि पुढच्याच षटकात हिली सुद्धा ७२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या दोघी बाद झाल्यानंतर मेग लॅनिंग आणि ॲएलिस पेरी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. पावसामुळे खेळ काही काळ थांबला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पेरी २८ धावांवर बाद झाली. लॅनिंग शानदार फलंदाजी करताना शतकाकडे वाटचाल करत होती पण मेघना सिंगने तिला ९७ धावांवर माघारी धाडले. शेवटी, झुलन गोस्वामीच्या षटकात बेथ मुनीने दोन चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मुनीने नाबाद ३० धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषक स्पर्धेतील सलग पाचव्या विजयाची नोंद केली. उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला संघ ठरला आहे.