Latest

कोणत्याही राजकीय पक्षात सामील होणार नाही : यशवंत सिन्हा

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी कोणत्याही राजकीय पक्षात सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडेच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराकडून सिन्हा यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता.

आगामी काळात आपण स्वतंत्र राहणार आहे. सार्वजनिक जीवनात कोणत्या प्रकारची भूमिका घ्‍यावी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही सिन्हा यांनी नमूद केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी गोटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिन्हा यांनी तृणमूलच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

तुम्ही अजूनही तृणमूल नेतृत्वाच्या संपर्कात आहात का? असे विचारले असता सिन्हा यांनी नकारात्मक उत्तर दिले. यासंदर्भात माझ्याशी कोणी बोललेले नाही आणि मीही कोणाशी बोललेलो नाही, असे ते म्हणाले. एकेकाळी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्रीपद भूषविलेल्या सिन्हा यांनी नंतर वेगळी वाट धरली होती. 2018 साली भाजपला रामराम केल्यानंतर मार्च 2021 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT