Latest

Suicide: नव-याने पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून बायकोने घेतला गळफास

रणजित गायकवाड

कोटा (राजस्थान); पुढारी ऑनलाईन : Suicide : पती-पत्नीमधील भांडणाच्या वार्ता आपण नेहमीच इकडून-तिकडून ऐकत असतो. संसार म्हटलं की भांडणे आलीच, भांड्याला भांड लागतं अशा मराठीतली म्हणी सुद्धा आपल्या कानावर नेहमी पडतात. अशातच किरकोळ भांडण जीवघेणे ठरल्याच्याही बातम्या आपण अनेकवेळा वाचल्या-ऐकल्या आहेत. असे एका वेगळे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पतीने आपल्या पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून संतप्त पत्नीने स्वत:चे जीवन संपवले. ही घटना राजस्थानच्या कोटा शहरातील आमरकेपुरम येथे घडली.

राजस्थानच्या कोटा येथील आर के पुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 23 वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. मृत अंजली सुमन ही कोटा (राजस्थान) येथील रामचंद्रपुरा मधील रहिवासी होती. तिचे लग्न दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील मंदसौर येथे राहणाऱ्या शुभमसोबत झाले होते. तो कोटामध्ये नोकरी करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कोटा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. बुधवारी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी शुभम आणि अंजली यांच्यात भांडण झाले. पत्नीने आपल्या पसंतीचा शर्ट पतीला शिवण्याचा आग्रह धरला. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पती जेवण न करता घरातून बाहेर पडला. यानंतर अंजलीने घरात गळफास घेतला.

मृत अंजलीचा पती शुभमने पोलिसांना सांगितले की, तो एका खासगी कंपनीत काम करतो. आरके पुरमच्या आवळी रोझारी भागात भाड्याच्या घरात पत्नी आणि बहिणीसोबत राहतो. मंगळवारी पत्नीने त्याला त्याच्या आवडीचा शर्ट शिवायला सांगितले होते. पण यावरून आम्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मी जेवण न करता दुचाकीने कामावर गेलो. आफिसमध्ये असताना पत्नीचा एकदा फोन आला. तिला माझ्याशी बोलायचे होते. पण मी कामात असल्याने घरी आल्यावर बोलतो, असे सांगितले. पण काही वेळानंतर शेजा-यांचा फोन केला आणि त्यांनी अंजली आत्महत्या केल्याची माहिती दिली.

आरके पुरम पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल रामबाबू म्हणाले की, वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन केले आहे. यानंतर बुधवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणी अंजलीच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

SCROLL FOR NEXT