Latest

हिंगोली : गुप्त धनाची लालसा; मध्यरात्रीत घरात खोदला खड्डा, ७ जण ताब्‍यात, लिंबू, हळद, कुंकू जप्त

निलेश पोतदार

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील तुप्पा येथे गुप्त धन काढण्याच्या लालसेने खड्डा खोदून पुजा करणाऱ्या सात जणांना पोलिसांच्या पथकाने आज (मंगळवार) पहाटे ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पुजेचे साहित्य व गुप्त धन दाखविण्यासाठी आणलेली अल्पवयीन मुलगीही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, तुप्पा येथील शिवप्रसाद आत्माराम सुर्यवंशी यांच्या घरात गुप्तधन असल्याचा भास त्यांच्या कुटुंबियांना होत होता. त्यांच्या पत्नीने हा प्रकार त्यांना सांगितला होता. त्यामुळे त्यांनी गुप्तधन काढणाऱ्यांची माहिती घेण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांचा हिंगोली येथील चंद्रभान इंगोले (रा. बावनखोली, हिंगोली) यांच्याशी संपर्क झाला. त्या ठिकाणावरून पुढचे नियोजन करण्यात आले. सदरील गुप्तधन काढण्यासाठी त्यांनी सिध्देश्‍वर व जांभरून येथील त्यांना मदत करणाऱ्यांशी संपर्क साधला. गुप्तधन दाखविण्यासाठी पायाळू असलेल्या एका अल्पवयीन मुलीस त्यांनी सोबत घेतले.

दरम्यान, मंगळवारी पहाटे दोन वाजता शिवप्रसाद याच्या घरात गुप्तधन काढण्यासाठी लिंबू, हळद, कुंकु टाकून पुजा सुरु करण्यात आली. तसेच खड्डा खोदकामही सुरु झाले. मध्यरात्रीनंतर घरातून खड्डा खोदण्याचे आवाज येत असल्याने गावकऱ्यांनी या प्रकाराची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार दिलीप पोले, नागोराव होडगिर, गजानन होळकर, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी 10 ते 12 फुट खोल खड्डा खोदल्‍याचे दिसून आले. शिवाय पुजा केल्याचेही दिसून आले. यामुळे पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सात जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

या प्रकरणी जमादार दिलीप पोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवप्रसाद आत्माराम सुर्यवंशी (रा. तुप्पा, ता. कळमनुरी), काशीनाथ सिताराम जुमडे (रा. जांभरून ता कळमनुरी), दौलतखान शब्बीरखान पठाण (रा. मस्तानशहानगर, हिंगोली), मनसुरखान नबीखान पठाण (रा. सिध्देश्‍वर ता. औंढा नागनाथ), चंद्रभान जळबाराव इंगोले (रा. बावनखोली, हिंगोली) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक संतोष इंगळे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT