हिंगोली : पुढारी वृत्तसेवा वसमत येथील बसस्थानकावर बसची वाट पाहात थांबलेल्या महिलेच्या पर्समधील 1.70 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्या महिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात (गुरुवार) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्हयातील बरबडा येथील वर्षा शंकरराव देशमुख ह्या त्यांच्या नातेवाईकांसोबत परभणी येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी कार्यक्रम आटोपून सर्वजण गुरूवारी दुपारी टोने परभणी येथून वसमत येथील बसस्थानकावर आले. या ठिकाणी ते नांदेडकडे जाणार्या बसची वाट पहात थांबले. यावेळी बसस्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्समधील अडीच तोळ्याची सोन्याची चैन, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ तसेच एक हजार रुपये रोख असा 1.70 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे जाणारी बस आल्यामुळे सर्वजण बसमध्ये चढण्यासाठी धावले. यावेळी बसमध्ये चढत असतांना वर्षा यांना पर्सची चैन उघडी दिसली. त्यांनी पर्सची तपासणी केली असता त्यातील दागिने पळविल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बसस्थानकावरच चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही संशयीत दिसले नाही. त्यामुळे त्यांनी रात्री थेट वसमत पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, जमादार गजानन भोपे, प्रशांत मुंढे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जमादार भोपे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :