नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिंदी प्रसारिणी सभेच्या वतीने हिंदी दिनानिमित्त कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या हिंदी कवी संमेलनाचे आयोजन गुरुवारी (दि. १४) सायंकाळी ६ वाजता कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रवेशिका केवळ पासधारकांना असल्याचे आयोजकांच्या वतीने आयत्या वेळी प्रेक्षकांना सांगण्यात आल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. त्यावर उपस्थित प्रेक्षकांनी आम्हाला प्रवेश द्या अशी विनंती आयोजकांना केली होती. पण आयोजकांनी पासधारकांनाच प्रवेशाची भूमिका कायम ठेवल्याने हिंदी-मराठी भाषा वाद निर्माण झाला आणि कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. उपस्थित प्रेक्षकांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला.
संबधित बातम्या
शेवटी वाद विकोपाला गेल्यानंतर घटनास्थळी पोलिस, आरसीपी स्क्वाड दाखल झाले, तरी वाद मिटला नाही. शेवटी माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील, आ. सीमा हिरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यानंतर सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर अखेर शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द करण्यात आला. एवढ्यावर न थांबता नाट्यगृहात बसलेल्या प्रेक्षकांना आधी बाहेर येऊ द्या मगच आम्ही बाहेर पडू, अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतल्यानंतर सर्व प्रेक्षागृह रिकामे करण्यात आले आणि हिंदी दिनाच्या दिवशीच हिंदी-मराठी भाषावाद होऊन आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.
प्रेक्षकांचा हिरमोड
हिंदी साहित्यातील कवी डॉ. कुमार विश्वास हे लोकप्रिय व मोठे कवी आहेत. सोशल मीडियावरील त्यांचे व्हिडिओ, रिल्स प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यामुळे लोकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्यामुळे कार्यक्रमाला गर्दी होणे अपेक्षित असताना आयोजकांनी चुकीचे वृत्त प्रसारित केल्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला.
आमच्या संस्थेचे ९०० ते ९५० सभासद आहेत. त्यामुळे ज्यांनी कार्यक्रमाला मदत केली, अशा लोकांना तर पास दिले पण ज्यांनी मागणी केली, त्यांना मोफत पास देण्यात आले होते. कार्यक्रमात हिंदी मराठी दोन्ही भाषिक आहेत. फक्त बातमी देताना 'केवळ निमंत्रितांसाठी' असा उल्लेख करायचा राहिल्याने गोंधळ निर्माण झाला.
– रामप्रकाश सिंह, सहसचिव, हिंदी प्रसारिणी सभा
……
मित्राने व्हॉट्सॲपवर कार्यक्रमाची माहिती दिली म्हणून कुमार विश्वास यांना ऐकायला खास अमरावतीहून आलो होतो. पण इथे आल्यावर एवढा गोंधळ झाला की, कवी संमेलन रद्द झाले.
– प्रमोद लोणकर, अमरावती
…..
कवी कुमार विश्वास यांचा कार्यक्रम असल्याची बातमी दैनिकात वाचल्यावर कवी संमेलनाला आले. बातमीत कुठेही पासधारकांना प्रवेश असा उल्लेख नव्हता. इथे आल्यावर फक्त पासधारकांना मध्ये सोडत असल्याने हिरमोड झाला.
– स्नेहल जाधव, प्रेक्षक
हेही वाचा :