श्रीनगर : वृत्तसेवा जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करू पाहणार्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय संरक्षण दलाने युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. त्यामुळे पाक व्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांनी चंबुगबाळे गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. बालाकोटसारखा हवाई हल्ला होण्याची धडकी दहशतवाद्यांना बसल्याने व्याप्त काश्मीरमधून तळ हलविण्यास सुरुवात केली आहे.
अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत कर्नलसह तीन अधिकारी मंगळवारी शहीद झाले. यामध्ये पाकमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंट (टीआरएफ) या संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे.
व्याप्त काश्मीरमधून नियंत्रण रेषेपलीकडील पाक लष्कराच्या लाँचसपॅडनजीक दहशतवादी तळ ठोकत असल्याचे उघड झाले आहे. भारतीय हवाई हल्ल्यापासून बचाव होण्यासाठी दहशतवादी लष्कराचा आश्रय घेत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमार्फत दहशतवाद्यांना फंडिंग केले जात आहे. काश्मीरमध्ये घातपात अथवा मोठा हल्ला न केल्यास निधी बंद करण्याची धमकी आयएसआयने दहशतवाद्यांना दिली आहे. त्यामुळे दहशतवादी सक्रिय झाले आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मिरात मोठा दहशतवादी हल्ला करण्यास दहशतवाद्यांना यश आलेले नाही. त्यामुळे आयएसआयचा तिळपापड सुरू आहे. त्यामुळे काश्मिरातील दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्यासाठी आयएसआय सक्रिय आहे. व्याप्त काश्मिरातील तोयबाचा म्होरक्या साजीद जूट हा घातपाती कारवायासाठी सक्रिय झाला आहे.