वारणावती ; आष्पाक आत्तार : चांदोली राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. ही तोड करणारा विरप्पण मात्र कोण ? याचा अधिकारी शोध घेत आहेत. सद्यस्थितीला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वस्तुस्थिती पाहता गेल्या पंधरा वर्षापूर्वी उद्यानात झालेली कोट्यावधी रुपयांची नरक्या तस्करीची पुन्हा पुनरावृत्ती होणार की अधिकारी खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील उदगिरी नाका परिसरात सिसा व जांभळ जातीची सद्यस्थितीला चार झाडे तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहेत. गोपनीय खबऱ्या मार्फत ही माहिती मिळाल्यामुळे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तोडून ठेवलेला माल ताब्यात घेतला आहे. तसेच संपूर्ण बीट तपासणीचे आदेश दिले आहेत.
आज रोजी तेवीस दिवस झाले तरी त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे वन्यजीव विभाग व तस्कर यांचे लागे बंद आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सांगली ,सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर 317 चौरस किलोमीटर क्षेत्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान व सध्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारले आहे. या परिसरात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. जगातील सर्वात अधिक वनौषधी वनस्पतींचा ठेवा येथे आहे.
एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अधिकारी आणि कर्मचारी येथे आहेत. याचाच अनेक तस्कर फायदा घेत आहेत. पंधरा वर्षापूर्वी तर उद्यानातील शेकडो नरक्या वनस्पतीची झाडे तोडण्यात आली होती. विदेशी बाजारपेठांत कोट्यावधी रुपयांना ही वनस्पती विकली जात होती.
प्रसारमाध्यमांनी ही बाब उजेडात आणल्यानंतर संबंधित अधिकारी यांना निलंबित करून अनेक तस्कर आणि त्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आजही कोट्यवधी रुपयांची ही वनस्पती आणि जप्त केलेली वाहने वन्यजीव विभागाच्या कार्यालय परिसरात उभी आहेत. कोट्यवधी रुपयांचा नरक्या सडून गेला आहे तर वाहने गंजून गेली आहेत. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. तोपर्यंत उद्यान परिसरात पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्याचे सिद्ध झाले आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील ज्या परिसरात तोड झाली आहे तिथून साधारण सात किलोमीटर अंतरावर उदगिरी नाका आहे. येथे एक वनरक्षक व दोन सहाय्यक वनरक्षकांची नियुक्ती आहे. हे कर्मचारी कायमस्वरूपी येथे तैनात असतानाही गोपनीय खबऱ्याकडून हा प्रकार वन्यजीव विभागाला कळावा ? वन्यजीव विभागाने ही गुन्हा दाखल केलेला असताना प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर सांगावा या बाबी वन्यजीव विभागावर संशय निर्माण करणाऱ्या आहेत.
वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी संपूर्ण बीट तपासणीचा आदेश दिला आहे . या तपासणीत 4 ची 40 किंवा त्याहून अधिक झाडे असतील तर ती उजेडात यायला हवीत . सदर घटना गांभीर्याने घेऊन योग्य दिशेने आणि जलद तपास करून संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी अन्यथा थंड पडलेल्या नरक्या तस्करी च ग्रहण पुन्हा सुरू होईल यात शंका नाही.
23 फेब्रुवारी रोजी गोपनीय खबऱ्याकडून उदगीर बीड परिसरात झाडे तोडल्याची माहिती मिळाली. 4 झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून संपूर्ण बीट तपासणीचे आदेश दिले आहेत. दोन-तीन दिवसात संपूर्ण माहिती उजेडात येईल.
नंदकुमार नलवडे
वनक्षेत्रपाल चांदोली राष्ट्रीय उद्यान