Latest

राज्यात पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार; ‘या’ ठिकाणी जोर‘धार’ची शक्यता

अमृता चौगुले

ठाणे/पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पाऊस ओसरला असून, पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भ या भागातील तुरळक ठिकाणीच मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा हा परिणाम असेल, असे हवामान विभागातर्फे बुधवारी सांगण्यात आले. कोकण, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात केवळ ढगाळ वातावरण राहील. पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरालाही बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट आहे. या दोन दिवशी पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे; तर कोल्हापूर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोकण विभागात पडलेल्या मुसळधार पावसानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता पुन्हा कोकण विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी बांगला देशच्या किनार्‍यावर, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर बुधवारी हे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये गंगा खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत आहे. परिणामी, बुधवारपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत आहे.

रायगड, रत्नागिरीला बुधवार, गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT