नागपुरात सव्वा कोटींची लुटमार; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटनाक्रम कैद | Nagpur Crime | पुढारी

नागपुरात सव्वा कोटींची लुटमार; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटनाक्रम कैद | Nagpur Crime

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या लकडगंज ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या नेहरू पुतळ्याजवळ सुमारे सव्वा कोटी रुपयांची रक्कम लुटल्याची घटना घडली. या घटनेत २ आरोपींनी  घटनास्थळावर उपस्थित प्रत्यक्षदर्शींच्या समोर माऊझरचा धाक दाखवून ही रोकड लुटली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Nagpur Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज येथील व्यापारी विरम पटेल यांनी त्यांचे दुकान नेहमीप्रमाणे रात्री साडे आठच्या सुमारास बंद केले. त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सव्वा कोटी रुपयांची रोकड असलेली बॅग दिली. ही बॅग कर्मचाऱ्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन ते तिथून निघून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजनुसार पटेल यांच्या दुकानापासून थोड्याच अंतरावर तोंडावर मास्क न घातलेले दोन युवक उभे होते. कर्मचाऱ्यांची गाडी दिसताच युवकांनी गाडीला थांबवून कर्मचाऱ्यांना कुठलीही मारपीट न करता माऊझरचा धाक दाखवला. यावेळी दोन्ही कर्मचारी आरोपींच्या हाताला झटका मारून जीव वाचविण्यासाठी पळत गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरोपींनी देखील कर्मचारी घेऊन आलेली दुचाकी घेऊन पळ काढला. अखेर या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकास दिली. मालकाने तातडीने लकडगंज पोलीस ठाणे गाठले. सव्वा कोटी रुपयांची रक्कम लुटल्या गेल्याची माहिती पोलीस विभागात पसरताच पोलीस यंत्रणाही सज्ज झाली.(Nagpur Crime)

मात्र हे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सीसीटीव्ही फुटेज पाहता पोलिसांचा संशय प्राथमिक दृष्ट्या  दुकानातील कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. कारण हा एकंदर घटनाक्रम एकदम विचित्र आहे. आरोपी लूटमार करण्यासाठी पायी चालत आले. त्यानंतर तोंडावर कुठलाही मास्क लावला नाही आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा केली नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी आणलेल्या दुचाकीसह रोकड घेऊन पसार झाले.

Back to top button