Latest

Heavy Rainfall : ‘बिपरजॉय’ इफेक्‍ट; दक्षिण राज्यस्थानमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातसह महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांवर देखील परिणाम केला आहे. बिपरजॉय अद्याप पूर्णपणे शमलेले नाही, ते दक्षिण मध्य राज्यस्थानच्या भागात पुढे सरकत आहे. दरम्यान त्याचा प्रभाव आसपासच्या राज्यावर अजूनही जाणवत असून, आज सध्याकाळपर्यंत तो जाणवत राहणार आहे. त्यामुळे दक्षिण राज्यस्थानमध्ये अतिवृष्टीची (Heavy Rainfall) शक्‍यता आहे. अशी माहिती 'आयएमडी'चे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी 'एएनआय'शी बाेलताना दिली.

डॉ. नरेश कुमार म्हणाले की, "बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात आणि किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. यानंतर किनारपट्टीला वादळाचा मोठा तडाखा बसला. गुजरातमधील जखाऊ बंदरावर धडकल्यानंतर वादळाचा वेग काहीसा कमी झाला आहे; परंतु बिपरजॉयची वाटचाल पुढे ईशान्येकडे सुरूच आहे."

सध्या हे चक्रीवादळ दक्षिण मध्य राज्यस्थानच्या भागात आहे. आज संध्याकाळपर्यंत या वादळाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे दक्षिण राज्यस्थानमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच साेमवार १९ जून राेजी मध्य प्रदेशमध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये देखील पुढच्या २ ते ३ दिवसात मुसळधार (Heavy Rainfall) पावसाची शक्यता आहे, असेही डॉ. नरेश कुमार यांनी म्हटले आहे.

अरबी समुद्रातून वाहत असलेल्या वाऱ्यामुळे दिल्लीमध्ये देखील पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पूर्व भारतात मान्सून दाखल होणार आहे, असे देखील शक्यताही त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

'या' राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. पुढचे दोन ते दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या तीन दिवसांत देशातील उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, विदर्भ, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट येणार आहे. दरम्यान, बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT