लखनऊ, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बुधवारी रात्री १२ पेक्षा अधिक महिला आणि मुली एकाच वेळी विहिरीत पडल्या. त्यामध्ये ११ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघीजणी गंभीर जखमी आहेत. या घटनमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी लगेच मदतकार्य सुरू केले. त्यातील काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथे असणाऱ्या स्कूल टोला येथे घडली आहे. त्याठिकाणी एका घरात लग्न समारंभ होता. लग्नाच्या निमित्ताने सुरू असलेल्या हळदी समारंभात अनेक महिला आणि मुली उपस्थित होत्या. त्यातील काही महिला विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या, त्याचा भार जास्त पडल्यामुळे हा स्लॅब खाली कोसळला. त्यामध्ये सर्व महिला विहिरीत पडल्या.
स्थानिक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घटना घडल्यामुळे स्थानिक लोकांनी कंट्रोल रुमला फोन करून माहिती दिली. पण, काही लोकांनी त्वरीत मदतकार्य सुरू केले. महिलांची संख्या जास्त असल्यामुळे स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
विहिरीत पडलेल्या काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले तर, ११ महिलांचा मृत्यू जागीच झाला. २ महिला गंभीर जखमी झाल्या. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या घटनाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.