मुंबई : पुढारी वृत्तसेवा
'आय अॅम अ डिस्को डान्सर', 'जिमी जिमी जिमी, आ जा आ जा आ जा', 'याद आ रहा है तेरा प्यार,' या डिस्को गीतांनी जगावर गारूड करणारे संगीतकार, गायक तसेच बॉलीवूडमधील 'गोल्डमॅन' बप्पीदा ऊर्फ बप्पी लाहिरी यांनी बुधवारी जगाला अलविदा केला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापाठोपाठ भारतीय संगीत जगतातील आणखी एक 'सितारा' आसमंताकडे रवाना झाला.
भारतीय चित्रपट संगीताला थिरकणार्या डिस्को संगीताचा साज चढविण्याचे श्रेय बप्पीदांनाच जाते. त्यांचे 'जिमी जिमी' हे डिस्को गीत जगभर गाजले होते. पॉपस्टार मायकेल जॅक्सनही या गाण्याचा फॅन होता. 'डिस्को डान्सर'मधील गाणी रशियात तर जवळपास प्रत्येकाच्या ओठांवर रुळली होती. 69 वर्षीय बप्पी लाहिरी यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. 'ऑब्स्ट्रक्टिव स्लीप अॅप्नी' या आजाराने ते वर्षभरापासून त्रस्त होते. या आजारात झोपताना नाकातून हवेचा प्रवाह कमी होतो. बुधवारी सकाळी झोपेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पत्नी चित्रानी, मुलगी गायिका रिमा आणि मुलगा बप्पा असा परिवार त्यांच्यामागे आहे. बप्पा अमेरिकेतून निघाले आहेत. ते येथे पोहोचले की, बप्पीदांवर गुरुवारी मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. बप्पी लाहिरी यांचा जन्म पश्चिम बंगालमधील जलपायगुडी येथे 27 नोव्हेंबर 1952 रोजी झाला. त्यांचे खरे नाव अलोकेश लाहिरी असे होते. त्यांना संगीताचा वारसा आई-वडिलांकडूनच मिळाला. बप्पी लाहिरी यांच्या संगीत दिग्दर्शनात 'आओ तुम्हे चांद पे ले जाये' हे लतादीदींनी गायिलेले गाणे सुपर हिट ठरले होते.
बप्पीदा बॉलीवूडमध्ये संगीतकार म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची सुरुवात गायक म्हणून झाली. 1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1975 मध्ये 'जख्मी' चित्रपटात त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या समवेत गाणे गायिले होते. 'वारदात', 'नमक हलाल', 'शराबी', 'डान्स डान्स', 'कमांडो', 'साहेब', 'गँग लीडर', 'सैलाब' या चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी – 3' चित्रपटात भंकस हे त्यांनी संगीत दिलेले अखेरचे गीत ठरले. 'यार बिना चैन कहा रे…', 'याद आ रहा है तेरा प्यार…', 'रात बाकी, बात बाकी…', 'तम्मा तम्मा लोगे…', 'बम्बई से आया मेरा दोस्त', 'ऊलाला ऊलाला', 'तुने मारी एंट्री यार दिल मे बजी घंटिया..', हीही त्यांनी संगीत दिलेले चित्रपटगीते कमालीची गाजली.