पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या रविवारी झालेल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. कारणही तसेच होते. यंदाच्या हंगामात या संघाचे नेतृत्त्व हार्दिक पंड्याकडे आले आहे. रोहितच्या चाहत्यांना हा बदल सुरुवातीपासूनच रुचलेला नाही. त्यामुळे रविवार, २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध रोहित आणि हार्दिक एकत्र मैदानात उतरले तेव्हा दोघांकडेही फॅन्सचे लक्ष लागले होते. दरम्यान, या सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मोडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मैदानावर हार्दिक पंड्या हा क्षेत्ररक्षणासाठी रोहित शर्माला ऑर्डर देताना दिसत आहे. ही बाब रोहितच्या चाहत्यांना पचनी पडलेली नाही. ते हार्दिकला पुन्हा एकदा तुफान ट्रोल करत आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने कारवाईवर संपूर्ण नियंत्रण ठेवले. तो मुंबई इंडियन्यचा माजी कर्णधार रोहित शर्माला कमांड देताना दिसला. त्याने रोहितला सीमारेषेवर क्षेत्ररणास पाठवले. तेव्हा सर्वांना थोडे आश्चर्य वाटले. कारण यावेळी रोहित शर्मा हा ३० यार्ड वर्तुळात आत क्षेत्ररक्षणास उभा होता. रोहितने सीमारेषेवर पोझिशन घेतली. यानंतर गोलंदाज गेराल्ड कोएत्झीच्या सूचनानुसार हार्दिकने त्याला थोडे उजवीकडे जाण्याची ऑर्डर दिली. अखेरच्या षटकातील रोहित शर्माला करावी लागेलेली धावाधाव त्याच्या फॅन्सच्या जिव्हारी लागली.
कर्णधार म्हणून हार्दिकने आपल्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांचा योग्य ठिकाणी वापर करणे ही सामान्य बाब आहे. मात्र रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हार्दिक पंड्याला जोरदार फटकारले. तो तुफान ट्रोल झाला. कारण याच सामन्यात जसप्रीत बुमराहला पहिले षटक देण्याऐवजी हार्दिकने स्वतः पहिले षटक टाकण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन षटकात त्याने 20 धावा दिल्या. यानंतर जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देण्यात आली. बुमराह याने आपल्या पहिला षटकात विकेट पटकावली. यावरुनही हार्दिक ट्रोल झाला.
हार्दिक पंड्यावर तुफान मिम्स व्हायरल झाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'थांबा बेटा, टी-20 वर्ल्ड कपमध्ये तुला बघून घेतो, असा पळवतो की….'. तर एका युजरने म्हटले आहे की, 'रोहितला असे वागवलेले पाहून माझे रक्त उकळते.' अशा हार्दिक विरोधातील अनेक कमेंटने सोशल मीडियावर धिंगाणा सुरु झाला. रोहित शर्माच कसा मुंबई इडियन्सचा कर्णधार म्हणून योग्य होता यावरही युजर खल सुरू आहे.
IPL 2024 च्या हंगातील पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पहिल्या डावात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई संघ २० षटकांत नऊ गडी गमावून १६२ धावाच करू शकला. या विजयासह गुजरात गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरातचा दुसरा सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध एम चिदंबरम स्टेडियमवर होईल, तर मुंबई इंडियन्सचा सामना २७ मार्चला त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
हेही वाचा :