Latest

Happy New Year 2024 : नववर्षाचे जल्लोषी स्वागत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आसमंत उजळून टाकणारी नेत्रदीपक आतषबाजी, संगीताच्या तालावर ठेका धरत थिरकणार्‍या पावलांनी बेभानपणे नृत्य करत कोल्हापूरकरांनी रविवारी रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषी स्वागत केले. शहरातील हॉटेल्स, बगीचे रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून गेले होते. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Happy New Year 2024)

कोल्हापुरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल्समध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी शहराबरोबरच ग्रामीण भागातील रिसॉर्ट फुल्ल झाले आहेत. महापालिकेने रात्री बारापर्यंत सार्वजनिक बागा खुल्या ठेवल्याने नागरिकांची बागेतही गर्दी झाली होती. शहरातील धार्मिक स्थळांवर व काही सार्वजनिक इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्रीचा काऊंटडाऊन सुरू होऊन 12 वाजण्याचा टोला पडताच अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.(Happy New Year 2024)

नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांच्या गर्दीने शहर फुलून गेले होते. पन्हाळा, जोतिबा, गगनबावडा, शाहूवाडी परिसरातील हॉटेल्सवर गर्दी होती. अनेक ठिकाणी पॅकेज पार्टीअंतर्गत वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या गेल्या आहेत. यंदा पहाटेपर्यंत बीअर बार व वाईन शॉप खुले ठेवल्यामुळे डीजेच्या तालावर सरत्या वर्षाला निरोप देत तरुणाईच्या जल्लोषाला उधाण आले. तसेच रिसॉर्टवर पहाटेपर्यंत नववर्षाच्या स्वागतानिमित्त तरुणाईकडून संगीतावर ठेका धरला जात होता.

 शहरात दिवभर मासे, चिकन, मटण खरेदीसाठी दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौकात पोलिसांचा पहारा होता. शहरात येणार्‍या वाहनांची तपासणी केली जात होती. (Happy New Year 2024)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT