खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंहगड, राजगड आणि तोरणागडासह खडकवासला, पानशेत आदी पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पर्यटनस्थळांसह वनक्षेत्रात तसेच गडकिल्ल्यांवर अनुचित प्रकार रोखण्यासाठी वन विभाग, पोलिस प्रशासनासह पुरातत्व खाते दक्ष आहे.
परिसरातील हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट आदींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. बेकायदा पार्ट्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, 'पुणे-पानशेत रस्त्यावर नांदेड फाटा, खडकवासला धरण, डोणजे चौक, सिंहगड पायथा आदी ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. सिंहगड, तोरणा, राजगडावर जाणार्या पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.' सिंहगड, खडकवासला, राजगड, पानशेत परिसरात पर्यटकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज झाली आहे.
सिंहगड किल्ल्याच्या अरुंद घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वन विभागाने स्थानिक घेरा सिंहगड वनसंरक्षक समितीच्या माध्यमातून घाट रस्त्यावरील साईडपट्ट्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. घाटरस्त्यासह गडावर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली सिंहगड वन विभागाचे वन परिमंडलाधिकारी समाधान पाटील आणि सुरक्षारक्षकांची घाट रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
राजगड, तोरणागड आदी गडकोटांवर पर्यटकांना मुक्कामास मनाई करण्यात आली आहे. गडावर कोणत्याही पार्ट्या, गैरप्रकार होणार नाहीत यासाठी पुरातत्व विभागाने पहारेकरी, सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. पानशेत, वरसगाव, राजगड, तोरणा, मढेघाट मार्गावर वेल्हे पोलिसांनी तपासणी नाके उभारले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर हॉटेल, फार्म हाऊस, पर्यटकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिंहगड घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्ट्यांची दुरुस्ती केल्याने समोरासमोरून वाहतूक सुरू होईल. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा ताण कमी होईल. सायंकाळी सहानंतर गडावर तसेच वनक्षेत्रात पर्यटकांना मनाई केली आहे.
– समाधान पाटील, वन परिमंडलाधिकारी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईही देखील केली
जाणार आहे.– रणजित पठारे, सहायक पोलिस निरीक्षक, वेल्हे पोलिस ठाणे
हेही वाचा