Latest

Gyaarah Gyaarah: ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा-करण जोहरच्या नव्या वेब सीरीजचा टीझर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि अचिन जैन (सिख्या एंटरटेनमेंट) तसेच निर्माता करण जोहर आणि अपूर्व मेहता (धर्माटिक एंटरटेनमेंट) यांची संयुक्त निर्मिती असलेली वेब सीरीज येतेय. 'ग्यारह ग्यारह' असे वेब सीरीजचे नाव आहे. (Gyaarah Gyaarah) रहस्यमय- फँटसी ड्रामा प्रकारची ही वेबसीरीज आहे. या सीरीजमध्ये क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयल महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. (Gyaarah Gyaarah)

उमेश बिश्त यांनी दिग्दर्शित (पगलेट फेम), पूजा बॅनर्जी व संजय शेखर यांनी लिहिलेली 'ग्यारह ग्यारह'ची गोष्ट १९९०, २००१ आणि २०१६ अशा तीन वेगवेगळ्या दशकांत घडते. त्यात रहस्य, विज्ञान आणि गूढता यांचं अफलातून मिलाफ साधण्यात आला आहे.

करण जोहर म्हणाला, 'कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरणा देता येते, त्यांचं मनोरंजन करता येतं, त्यांना आव्हान देता येतं यावर एक फिल्ममेकर म्हणून मी कायमच विश्वास ठेवला आहे. आम्हा तिघांच्या एकत्र येण्यातून नाविन्यपूर्ण आशय निर्मिती होईल आणि सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या नव्या कथा मांडल्या जातील.'

गुनीत मोंगा कपूर म्हणाल्या, 'करण-अपूर्व यांच्याबरोबर 'ग्यारह ग्यारह'ची निर्मिती करणं हा नक्कीच एक रोमांचक अनुभव असेल. या सीरीजच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची कथा मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आम्हाला सुदैवी समजते. या सीरीजचं दिग्दर्शन उमेश बिश्त करत असून त्यांच्या कामावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या सीरीजची कथा प्रेक्षकांना अचंबित करेल याची मला खात्री वाटते.'

दिग्दर्शक उमेश बिश्त म्हणाले, 'सर्जनशील लोकांचा समावेश असलेल्या या टीमचा एक भाग होताना मला आनंद होत आहे. 'ग्यारह ग्यारह'साठी सर्वोत्तम गोष्टी एकत्र आल्या आहेत. दमदार कलाकार, कसदार लेखक व कुशल तंत्रज्ञ यासाठी काम करत आहेत. या सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल अशी आशा वाटते.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT