Latest

Ranji Trophy 2024 : 110 धावा काढताना ‘कर्नाटक’ची उडाली गाळण! ‘गुजरात’चा रोमहर्षक विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy 2024 रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप 'सी'मधील सामन्यात गुजरातने कर्नाटकवर अवघ्या सात धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने कर्नाटक समोर विजयासाठी 110 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कर्नाटकने अर्धशतकी सलामी दिली. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटक संघ हा सामना गमावेल असे कुणालाही वाटले नव्हते, पण सिद्धार्थ देसाईच्या फिरकीपुढे कर्नाटकच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले आणि त्यांचा संपूर्ण संघ 103 धावांत गारद झाला. सिद्धार्थने 13 षटकांत 42 धावा देत 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तत्पूर्वी, टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना क्षितिज पटेल (95), उमंग कुमार (72) आणि कर्णधार चिंतन गजा (45) यांच्या शानदार खेळीमुळे गुजरात संघाने 264 धावा केल्या. या काळात वासुकी कौशिकने कर्नाटककडून सर्वाधिक 4 बळी घेतले होते. कर्नाटकने गुजरातच्या 264 धावांसमोर पहिल्या डावात 374 धावा ठोकून 110 धावांची आघाडी घेतली. कर्णधार मयंक अग्रवालच्या (109) शतकाशिवाय कर्नाटकला आघाडी मिळवून देण्यात अनुभवी मनीष पांडेने 88 धावांचे योगदान दिले.

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या गुजरात संघाची कामगिरी यावेळीही निराशाजनक राहिली. संपूर्ण संघ केवळ 219 धावांवर बाद झाला. मनन हिंगराजिया आणि उमंग कुमार यांनी अर्धशतकी खेळी केल्या, ज्यामुळे कर्नाटकला 110 धावांचे आव्हान मिळाले.

या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने पहिल्या 9 षटकात एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या. यानंतर 50 धावांवर मयंक अग्रवालची विकेट पडली. विजय फक्त 60 धावांची गरज असताना कर्नाटक संघाच्या हाती 9 विकेट्स होत्या, ज्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, गुजरातच्या सिद्धार्थ देसाईने आपले फिरकीचे जाळे फेकले, ज्यात 7 कर्नाटकी फलंदाज अलगद अडकले. तर संपूर्ण संघ 103 धावांत गारद झाला. अशाप्रकारे नाबाद अर्धशतकी भागिदारीनंतर पुढील 53 धावांत दहा विकेट गमावण्याची नामुष्की कर्नाटकवर ओढवली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT