Latest

Gudi Padwa 2024 : आदल्या दिवशी सूर्यग्रहण; पण गुढीपाडव्याचा दिवस शुभच

मोहन कारंडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तसेच मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी वैधृती योग असला तरीही साडेतीन मुहूतपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. त्यामुळे नवीन उद्योगाला, व्यवसायाला आणि कार्याला सुरुवात करण्यासाठी मंगळवारी गुढीपाडव्याला उत्तम मुहूर्त असून या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभारून, तोरण लावून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि पाडव्याचा आनंद साजरा करावा, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरावी, असेही त्यांनी सांगितले.

गुढी उभारताना हे करा…

गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत, ती स्वच्छ धुऊन आणि पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. साखरेच्या गाठीची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे, ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी. हळद- कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच 'ब्रह्मध्वज' असेही म्हटले जाते.

तीन गुरुपुष्यामृत योग

सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण तीन गुरुपुष्यामृत योग आहेत. यावर्षी ६ मे ते २५ जून शुक्राचा अस्त असून ८ मे ते १ जून या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे ८ मे ते १ जून या कालावधीत एकत्रितपणे गुरू आणि शुक्राचा अस्त असल्याने कोणत्याही मंगल कार्याकरिता मुहूर्त नाही, असेही मोहन दाते यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT