नारीशक्तीचा जल्लोष..!

नारीशक्तीचा जल्लोष..!
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाचे जल्लोषी स्वागत करत, आत्मसन्माची गुढी उभारत, महिलांची रविवारी रुबाबदार आणि दिमाखदार बाईक रॅली निघाली. दै. 'पुढारी', टोमॅटो एफएम आणि कस्तुरी क्लब यांच्या वतीने प्रथमच आयोजित या महिला बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला. हजारो महिलांनी सक्षमीकरणाचा नारा देत काढलेल्या या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले.

दै. 'पुढारी', टोमॅटो एफएम आणि कस्तुरी क्लब आयोजित पॉवर्ड बाय आयआयबी आणि वीणा वर्ल्डच्या सहकार्याने चाटे शिक्षण समूह, अ‍ॅस्टर आधार आणि नरके पन्हाळा पब्लिक स्कूल हे या रॅलीचे सहप्रायोजक होते. एचपी ग्रुप हा या रॅलीचा हॉस्पिटॅलिटी पार्टनर होता, तर स्वर्ग ज्वेलर्सच्या वतीने रॅलीतील सहभागी सर्व महिलांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले.

पारंपरिक दागिने, नऊवारी साड्या, त्यावर लाल रंगाचा रुबाबदार कोल्हापुरी फेटा परिधान करून मोठ्या दिमाखात दुचाकी चालवणार्‍या महिला आणि संपूर्ण रॅली मार्गावर सळसळणारा उत्साह अशा शहरात नारीशक्तीचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडले. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले.

डीजेच्या ठेक्यावर ताल धरलेल्या महिलांनी रॅलीच्या प्रारंभी दसरा चौकातील वातावरण उत्साही आणि जल्लोषी बनले होते. त्यात सहभागी होणार्‍या महिला जसजशा वाढत गेल्या, तसतसे उत्साहाला उधाण आले. हाच उत्साह आणि आनंद संपूर्ण रॅलीत ओसंडत होता. नाशिक ढोल-ताशांवर ताल धरत रॅलीतील सहभागी महिला गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाचे जल्लोषी स्वागत करत होत्या.

दसरा चौकात गुढीपूजनाने प्रारंभ

दसरा चौकात प्रारंभी गुढीपूजन करण्यात आले. यानंतर 'सर्व मंगल मांगल्ये, शिवे सवार्थ साधिके, शरण्य त्र्यंब्यके गौरी नारायणी नमस्तुते' असा जप करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी वीणा वर्ल्डच्या अबोली सोनटक्के, आयआयबीचे अमित जाधव, आधार हॉस्पिटलच्या डॉ. श्वेता गायकवाड, नरके पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळाच्या जयश्री नरके, चाटे ग्रुपच्या साक्षी दळवी, एच.पी. ग्रुपचे निखिल कदम यांचा दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव व सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वीणा वर्ल्डचे अजय घाटगे, सचिन बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मान्यवरांनी रॅलीला ध्वज दाखवला.

दसरा चौकातून निघालेली ही रॅली व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नरमार्गे करवीर संस्थापिका, रणरागिणी महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्यासमोर आली. 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत, ताराराणींपुढे नतमस्तक होत रॅली पुढे उड्डाणपुलाच्या दिशेने मार्गस्थ झाली. मराठी लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवणार्‍या 109 मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनसमोरून ही रॅली शिक्षणाची समृद्ध परंपरा असलेल्या शिवाजी विद्यापीठ चौकातून सायबर चौकात आली. आई आणि मुलाच्या अलौकिक प्रेमाचे प्रतीक असलेल्या माऊली चौकातून रॅली सदैव आपल्या कौशल्य आणि उद्यमशीलतेचे प्रतीक असलेल्या उद्यमनगरात आली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे सदैव स्मरण करणार्‍या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोरून ही रॅली टेंबे रोड, खासबाग, मिरजकर तिकटीमार्गे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या सदैव वास असणार्‍या महाद्वारवर आली. रॅली येताच संपूर्ण महाद्वार रोडवर चैतन्याचा बहर आला. अंबाबाईचरणी रॅलीतूनच महिला नतमस्तक झाल्या. यानंतर रॅली पापाची तिकटी, महापालिकामार्गे भाऊसिंगजी रोड, पुढारी भवन, सीपीआर चौकमार्गे दसरा चौकात आली. दसरा चौकात रॅली येताच महिलांच्या उत्साहाला पुन्हा उधाण आले. डीजेच्या तालावर महिलांनी ठेका धरला. यावेळी सहभागी महिलांना अल्पोपाहार, सहभागाचे प्रमाणपत्र आणि आकर्षक गिफ्ट देण्यात आले. रॅलीला सहकार्य करणार्‍या मैत्रीण मंचच्या माधुरी नकाते, भरारी फाऊंडेशनच्या गायत्री राऊत, मंजिरी मोरे, गोखले महाविद्यालयाच्या देसाई, कस्तुरी क्लबच्या 'एरिया लीडर' आदींसह 14 संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.

पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम

नऊवारी साडी, नथ अशी पारंपरिक वेशभूषा आणि हातात बुलेट, यामाहासह स्पोर्टस् बाईकचे हँडल असा पारंपरिक आणि आधुनिकतेचा अनोखा संगम महिला बाईक रॅलीत होता. संपूर्ण रॅली मार्गावर शहरवासीय या रॅलीचे फोटो घेत होते, व्हिडीओ घेत होते. यानंतर काही वेळातच शहरासह जिल्ह्यात आणि राज्याच्या कानाकोपर्‍यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महिला बाईक रॅली पोहोचत होती. रविवार असल्याने शहरात भाविक आणि पर्यटकांचीही मोठी गर्दी होती. रस्त्यावरून जाणारी ही महिला बाईक रॅली भाविक, पर्यटक कुतूहलाने आणि तितक्याच अप्रुपाने पाहत होते.

अवघे कोल्हापूर झाले रॅलीमय

शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली निघाली. पारंपरिक वेशभूषेसह प्रत्येक महिलेच्या डोक्यावरील लाल रंगाच्या फेट्याने संपूर्ण रॅली मार्गावर मर्‍हाटमोळी संस्कृती अवतरली होती. संपूर्ण शहरात 'पुढारी'च्या या महिला बाईक रॅलीचीच चर्चा दिवसभर सुरू होती. यामुळे अवघे कोल्हापूर रविवारी रॅलीमय झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news