बाळूमामा भंडारा यात्रा : सहा टन भंडाऱ्याची उधळण; हजारो भाविकांची उपस्थिती | पुढारी

बाळूमामा भंडारा यात्रा : सहा टन भंडाऱ्याची उधळण; हजारो भाविकांची उपस्थिती

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरु बाळूमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवार (दि. 7) संपन्न झाली. यात्रेनिमित्त श्रींच्या पालखीचा सहवाद्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला. या मिरवणुकीत सहा टन भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. पिवळ्या भस्माच्या उधळणीमुळे आदमापुर चे रस्ते पिवळे धमक झाले.

पारंपारिक वाद्याचा गजर, डॉल्बीचा ठेका, हरी भजनाची साथ या पालखी सोहळ्याला लाभली. बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत बाळूमामाचे भक्तगण आपल्या नवसाचा भंडारा ही उधळण करत होते.

कोणताही अनुचित प्रकार न होता यात्रा सुरळीत पार पडली. पालखी सोहळ्यामध्ये बाळूमामाच्या 19 बग्यातील अश्व सहभागी झाले होते. हलगी कैताळाच्या आवाजात अश्वानी केलेला नाच लक्षवेधी ठरला. यात्रा काळात श्री च्या मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई आकर्षक ठरली. मंदिरात केलेली विविध रंगांच्या फुलांची सजावट व मंदिर परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या.
यात्रा काळात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावर्षी यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन देवालय प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व बाळूमामाचा भक्तगण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन यात्रेसाठी केले होते .यात्रेसाठी आवश्यक असणारा पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्यासाठी आवश्यक असणारा दवाखाना, भक्तांच्यासाठी आवश्यक असणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्यात आली होती.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ,आंध्र, राजस्थान व अन्य राज्यातून आलेल्या लाखो भाविकांना कोणत्याही अडचणींना सामना करावा लागला नाही. श्री चे दर्शन सुलभ झाले यामुळे भाविकात समाधानाचे वातावरण दिसत होते.

 पालखी सोहळा…

यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळूमामाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज, फटाक्याची आतषबाजी, हलगी घुमक्याचा ताल ,लेझीम ,बँड अशी पारंपारिक वाद्य वापरत डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई दंगून गेली. हरी भजनात वारकरी बांधव रंगून गेले. बाळूमामाच्या नावानं चांगभलं त सारा गाव दुमदुमून गेला होता. सकाळी आठ वाजता बाळूमामा मंदिर येथून प्रस्थान झालेली पालखी मुख्य रोड मार्गे मरगुबाई मंदिरात भेटीसाठी दाखल झाली. त्यानंतर ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरामध्ये पालखीची भेट झाली. कर्णसिंह धैर्यशील भोसले यांच्या सरकार वाड्यात पालखी काही काळ स्थिरावली. त्यानंतर मधली गल्ली, माळवाडी, खालची गल्ली मार्गे आड विहीर येते भंडारा अर्पण करुन चार वाजता पालखी मंदिरात स्थिरावली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री ची आरती झाली. पालखी मार्गावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. हजारो भावीक भंडाऱ्यात रंगून गेले. संपूर्ण गावातील रस्ते भंडाऱ्यात पिवळे धमक होऊन गेले होते. मंदिराचे मानकरी कर्ण सिंहराजे भोसले, कृष्णात पुजारी, नामदेव दळवी रागीणी खडके व ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी ,तरुण मंडळे यांनी केलेले सहकार्य अतिशय मोलाचे ठरले. सेवाभावी वर्तीने केलेली सेवक म्हणून जबाबदारी या यात्रेतील वैशिष्ट्य ठरली. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यात्रा सुरळीत…

भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, गट विकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्धन ,आरटीओ स्नेहा देसाई ,ग्रामसेवक पवन बोंगाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख डीएस मिरजकर ,भुदरगडचे एसटी आगार प्रमुख प्रशांत नाईक ,विकास वर्णे , काळमवाडी प्रकल्प अधिकारी, वीज वितरण कर्मचारी या सर्वांनी आपापली कामे जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण केल्याने यावर्षी जी यात्रा आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली. भुदरगड चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केलेली वाहतूक व्यवस्था व काटेकोरपणे केलेली अंमलबजावणी यामुळे वाहतुकीची कोंडी झालेले बाळूमामाच्या भक्तांना कुठलाही त्रास झाला नाही. प्रति आमवाशाला अशाच पद्धतीने वाहतूक नियोजन व्हावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

Back to top button