Latest

Great Pyramid of Giza गिझाच्या ग्रेट पिरॅमिडमध्ये आढळला 9 मीटर लांबीचा छुपा मार्ग

Arun Patil

कैरो : जगातील सात आश्चर्यांमध्ये इजिप्तमधील पिरॅमिडचा (Great Pyramid of Giza) समावेश होतो. हजारो वर्षांपूर्वीचे हे पिरॅमिड आजही मानवाला थक्क करीत आहेत. तसेच त्यांच्याबाबतचे संशोधन सातत्याने सुरूच असते. आता गिझामधील 4500 वर्षांपूर्वीच्या पिरॅमिडमध्ये मुख्य द्वारापासून जवळ सुमारे 9 मीटर म्हणजेच 30 फूट लांबीचा छुपा कॉरिडॉर सापडला आहे. इजिप्तच्या पुरातत्त्व संशोधकांनी सांगितले की, पिरॅमिडच्या अंतर्भागातील या मार्गाचा शोध 'स्कॅन पिरॅमिड' प्रोजेक्टमधून घेण्यात आला.

यासाठी संशोधकांनी 2015 पासून इन्फ्रारेड थर्मोग्राफी, 3 डी सिमुलेशन आणि कॉस्मिक-रे इमेजिंगसहित पिरॅमिडच्या (Great Pyramid of Giza) वास्तूला धक्का न लावणार्‍या अन्य तंत्रज्ञानाचा वापर केला. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या शोधामुळे पिरॅमिडची निर्मिती तसेच या मार्गाच्या समोर असलेल्या चुनखडीच्या संरचनेबाबत नवा प्रकाश पडू शकतो.

गिझाच्या ग्रेट पिरॅमिडची निर्मिती इसवी सन पूर्व 2560 या वर्षी फेरो खुफु किंवा चेऑप्स याच्या शासनकाळात झाली होती. सुरुवातीला हा पिरॅमिड 146 मीटर म्हणजेच 479 फूट उंच होता. मात्र आता त्याची उंची 139 मीटरच राहिलेली आहे. सन 1889 पर्यंत म्हणजेच पॅरिसमध्ये आयफेल टॉवरची उभारणी होईपर्यंत हा पिरॅमिडच (Great Pyramid of Giza) मनुष्यांनी बनवलेली सर्वात उंच संरचना होती.

इजिप्तच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ अँटिक्विटीजचे प्रमुख मुस्तफा वजिरी यांनी सांगितले की, हा मार्ग अर्धवट बांधलेला आहे. कदाचित त्याची निर्मिती पिरॅमिडच्या (Great Pyramid of Giza) वजनाला मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपास विभागण्यासाठी किंवा आतापर्यंत पाहण्यात न आलेल्या एखाद्या गोपनीय कक्षाकडे जाण्यासाठी केली असावी. हा पोकळ सुरुंगासारखा मार्ग मेन गेटपासून सात मीटरच्या अंतरावर आहे. त्याच्या खाली किंवा शेवटच्या भागात काय आहे हे पाहण्यासाठी संशोधन सुरू आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT