आम्ही जिथं जातो, तिथं बाबरी पडतेच: संजय राऊत यांचा आमदार बाबर यांच्यावर निशाणा | पुढारी

आम्ही जिथं जातो, तिथं बाबरी पडतेच: संजय राऊत यांचा आमदार बाबर यांच्यावर निशाणा

विटा: पुढारी वृत्तसेवा : आम्ही जिथं जातो, तिथं बाबरी पडतेच !, आपण वीट नाहीतर दगड तर मारुच. विट्याचा पुढचा आमदार ठाकरे गटाचा असेल, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (दि.३) व्यक्त केला. राऊत यांचे विट्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पाटील, शहराध्यक्ष अविनाश चोथे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, शिवाजी शिंदे, तालुका प्रमुख राज लोखंडे, अॅड. संदीप मुळीक, शंकर मोहिते, संग्राम माने, अॅड. सचिन जाधव, अॅड विजय जाधव, प्रताप सुतार, विनोद पाटील, सुभाष भिंगारदेवे, रवी कदम आदीसह शिंदे गटाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राऊत पुढे म्हणाले, मी येथे येणार आहे, असे समजल्यावर म्हणे स्पिकरला परवानगी दिली नाही. पण माझा आवाज स्पीकर शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात जातो. गावागावातले पाणी बंद केले आहे. सगळीकडे दहशत चालू आहे. येथील आमदार तर अपात्र ठरणारच आहेत. सर्वोच्च न्यायालय त्यांना घरी बसवणार आहे. नाहीतर जनता घरी बसवणार आहेच, असा निशाणा राऊत यांनी नाव न घेता आमदार अनिल बाबर यांच्यावर साधला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर विटा येथील जनता विसरणार नाही. मी इथे परत येणार आहे. आज थोडी घाई आहे, परंतु विटा कार्यक्रम विशेष आयोजित करायला जिल्हाप्रमुखांना सांगितला आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. बाळासाहेबांनी आपल्याला अभिमान शिकवला, अस्मिता दिली त्यांच्याशी बेईमानी करणारा कोणीही असो, त्याला सोडायचे नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button