Latest

गोपीचंद पडळकर : ‘एसटी बँक आणि मालमत्ता गिळंकृत करण्याचे शरद पवारांचे षड्यंत्र’

अनुराधा कोरवी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते. आता शकुनी काकांनी याचा फायदा उचलून दोन हजार कोटीची एसटी बँक आणि मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.

आ. पडळकर यावेळी म्हणाले, बँकेची निवडणूक घोषित केली आहे. आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढण्यात आला आहे. त्यामुळे साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली. आणि सभासद फी च्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम अशा वेगवेगळ्या मार्गाने जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले आहेत.

या निधीतून वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलिशान गाड्या खरेदी करून दिल्या. पण ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होता. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा असलेल्यानी माणुसकीखातर सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही असेही ते म्हणाले.

तसेच पुढे त्यांनी जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत केली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT