नाशिक : अल्पवयीन प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी प्रियकरास जन्मठेप | पुढारी

नाशिक : अल्पवयीन प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी प्रियकरास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : चारित्र्यांच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१८ मध्ये ही घटना उघडकीस आली होती. दिलीप सुरेश थाटसिंगार (३०, रा. मातंगवाडा, भद्रकाली) असे या आरोपीचे नाव आहे.

दिलीप याने १७ वर्षीय पीडित मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तिला ऑगस्ट ते सप्टेंबर २०१८ महिन्यात त्याच्या घरी आणले होते. घरी आणल्यानंतर दिलीपने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेच्या भावाने फिर्यादीत म्हटले होते. वारंवार अत्याचार व तिच्या चारित्र्यावर संशय घेत दिलीपने तिला बेदम मारहाण केली. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलीपने पीडितेचे हात पाय बांधून तिला लाकडी दांडा व वायरने बेदम मारहाण केली. यात पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडितेच्या भावाच्या फिर्यादीनुसार दिलीपविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात खुन, बलात्कार, अपहरणासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भद्रकाली पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला न्यायाधिश डी. डी. देशमुख यांच्या न्यायालयात सुरु होता. सरकारतर्फे अ‍ॅड. दिपशिखा भिडे यांनी युक्तीवाद करीत बारा साक्षीदार तपासले. दिलीप विरोधात खुनाचा गुन्हा शाबित झाल्याने न्यायालयाने त्यास जन्मठेप आणि दहा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button