Latest

नागपूर विमानतळावर हातोड्यातून सोन्याची तस्करी; तिघांना अटक

अनुराधा कोरवी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आखाती देशातून नागपुरात सोन्याची तस्करी होत असल्याचे आज गुरूवारी उघडकीस आले आहे. दुबईतून नागपुरात चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली आहे. या प्रकरणात तीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळील लोखंडी हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजारात लपवलेले ३३७ ग्रॅम सोने जप्त केलं आहे.

हे साहित्य दुबईवरून भारतात घेऊन येणारा मजूर असून तो उत्तर प्रदेशमधील आजमगड येथील रहिवासी आहे. तर विमानतळावर त्याच्याकडून अवजारांची बॅग घ्यायला आलेले दोन्ही आरोपी राजस्थानच्या नागौरचे आहेत. त्यामुळे नागपूर विमानतळ हे परदेशातून होणाऱ्या सोने तस्करीचा नवा मार्ग बनला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मजुरांनी सोन्याची तस्करी करण्यासाठी नवी शक्कल लढविली आणि पकडले जाऊ नये म्हणून हातोडा, मोठे स्टेपलर व इतर काही अवजारांमध्ये असलेल्या छिद्राच्या माध्यमातून त्यात सोने वितळून टाकले. अवजारांमध्ये सोने वितळून लपवले जाते आणि नंतर हे अवजार एखाद्या मजुराच्या माध्यमातून भारतात पाठवले जाते.

याबाबतची माहिती अशी की, ६ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील आझमगडचा मजूर राहुल यादव हा दुबईवरून भारतात परत आला. आपल्याकडील अवजारांची बॅग त्याने नागपूर विमानतळावरील पार्किंगमध्ये अक्रम मलिक आणि इर्शाद खान नावाच्या नागौर जिल्ह्यातील दोघांच्या हवाली केली. दुबईवरून सोने तस्करी होत असल्याच्या संशयावरून आधीच विमानतळावर पाळत ठेवलेल्या नागपूर पोलिसांना तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यात हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजार अशा वस्तू सापडल्या. या वस्तू पाहून पोलिसांनी दुबईवरून विमानाने वस्तू कशासाठी आणि का आणल्या आहेत? असा प्रश्न विचारल्यावर तिघांनी प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ केली. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील अवजारांची सोनारकडून तपासणी केली असता छुप्या छिद्रातून ३३७ ग्रॅम सोने तस्करी केल्याचे उघड झाले.

तिन्ही आरोपींच्या आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे, आजमगडचा मजूर राहुल यादव याला दुबईत मोती खान नावाच्या व्यक्तीने एक बॅग भारतात आमच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा असे सांगितले होते. त्यासाठी राहुल यादवची दुबईवरून नागपूरपर्यंत आणि नागपूरवरून उत्तर प्रदेशपर्यंतच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटांची व्यवस्था करून दिली होती. सोबतच नागपूर विमानतळावर कोणाकडे ही बॅग सोपवायची आहे, त्या व्यक्तींचे फोटोही राहुल यादवकडे देण्यात आले होते. दुबईवरून काही तस्कर गरीब भारतीय मजुरांच्या वापर करून नागपूर मार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग निर्माण करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

हेही वाचंलत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT