हिंगोली : औंढा येथे कार तलावात बुडाल्याने युवकाने प्राण गमावले | पुढारी

हिंगोली : औंढा येथे कार तलावात बुडाल्याने युवकाने प्राण गमावले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने कार गंधकुटी तलावात बुडाली. यात वेळीच कार बाहेर पडता न आल्याने चक्रधर सावळे (वय 20) या युवकाचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बुडालेली कार क्रेनच्या सहाय्याने तलावातून बाहेर काढण्यात आली.

औंढा नागनाथ येथील गंधकुटी तलावाजवळच चक्रधर गजानन सावळे यांचे दुकान आहे. ते निशाणा येथे राहतात. रात्री त्यांचे वडील गजानन साळवे यांनी गावाकडे चारचाकी गाडी घेऊन ये असे सांगितले होते. त्यानुसार चक्रधर औंढा येथे येऊन बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी आपल्या कारने (एमएच 14 बी. सी. 1397) निघाला. परंतु, कार रिव्हर्स घेत असताना रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या गंधकुटी तलावात कार गेली, त्यानंतर कारचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या चक्रधरचा गाडीतच मृत्यू झाला.

दरम्यान, नातेवाईकांनी त्याचा दिवसभर शोध घेतला असता तो सापडला नाही. तसेच वडिलांनी सांगीतल्याप्रमाणे गाडीसुद्धा कुठे आढळली नाही. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाडी तलावात गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर नगराध्यक्ष कपिल खंदारे, नगरसेवक मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे बीट जमादार संदीप टाक संस्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली असता त्यात मृतदेह आढळून आला.

तलावास संरक्षक भिंत वा कुंपण नाही. बाजूनेच महत्त्वाच्या कार्यालयाकडे व नागेश्वर नगरकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. सध्या पावसामुळे तलाव भरलेल आहे. त्यामुळे या रस्त्यावरचा प्रवास धोकादायक बनला आहे.

तलावाला कठडे बसविण्याची मागणी

औंढा नागनाथ येथील मंदिराच्या पूर्व दिशेला दोन तलाव आहेत. ही दोन्ही तलाव तुडुंब भरले आहेत. या ठिकाणी ये जा करणार्‍याची मोठी वर्दळ असते कुठेही सूचना फलक नाही त्या मुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली असल्याने तलावाला कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

Back to top button