Gold Prices : कमकुवत झालेला डॉलर आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कमी व्याजदरवाढीच्या अपेक्षेने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराला उभारी मिळाली आहे. भारतातही सोन्याने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५६,४६२ रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ५६,०९७ रुपयांवर होता. तर काल शुक्रवारी सोन्याचा दर ५६,२५४ रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर सोन्याचा दर दिवसभरातील २०८ रुपयांच्या तेजीसह ५६,४६२ रुपयांवर बंद झाला. तर गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सोन्याचा दर ३६५ रुपयांनी वाढला. हा आतापर्यंतचा सोन्याचा विक्रमी उच्चांक आहे. याआधी चालू जानेवारी महिन्यातच सोन्याने ५६,२५९ रुपयांचा टप्पा गाठला होता. हा विक्रम आता सोन्याने तोडला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल शुक्रवारी (दि.१३) २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,४६२ रुपये, २३ कॅरेट ५६,२३६ रुपये, २२ कॅरेट ५१,७१९ रुपये, १८ कॅरेट ४२,३४७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३३,०३० रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६८,११५ रुपयांवर बंद झाला होता.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १,९०० डॉलरच्या वर गेल्याने भारतात सोन्याच्या किमतीने फ्यूचर्स मार्केटमध्ये नवा विक्रमी उच्चांक गाठला. काल शुक्रवारी गोल्ड फ्यूचर्स मार्केटमध्ये दर प्रति १० ग्रॅम ५६,२४५ रुपयांवर पोहोचला. याआधी ऑगस्ट २०२० मध्ये गोल्ड फ्यूचर्सवर सोन्याचा दर ५६,१९१ रुपयांवर गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात, शुक्रवारी सोन्याच्या किमती १,९०० डॉलर पातळीच्या वर स्थिरावल्या. अमेरिकेतील महागाईत घट झाल्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून कमी प्रमाणात व्याजदर वाढ होईल, असे संकेत मिळाले आहेत. यामुळे सोन्याच्या दराला (Gold Prices) झळाळी मिळाला आहे, असा अंदाज बाजारातील विश्लेषकांचा बांधला आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :