Latest

म्हैस दूध उत्पादनावर अधिक भर द्या! ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची दूध उत्पादकांना साद

अमृता चौगुले

सरूड : पुढारी वृत्तसेवा : व्यवसायिक दृष्टिकोनातून दूध उत्पादन केल्यास कुटुंबाची उन्नती साधता येते. दूध उत्पादकांनी बाजारपेठेतील म्हैस दूधाची वाढती मागणी विचारात घेता म्हैस दूध उत्पादनावर अधिक भर द्यावा. गाय दुधाच्या तुलनेत म्हैस दूध उत्पादन शेतकऱ्यांना अधिक किफायतशीर असल्याचे मत 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील संपर्क सभेत व्यक्त केले.
बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्हा सह. दूध (गोकुळ) संघाच्यावतीने बुधवारी (ता.२३) अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली या संपर्क सभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्थानिक संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले. तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या समोरील अडीअडचणी, तक्रारींचे निरसन करण्यासाठी गोकुळने या संपर्क सभेचे आयोजन केल्याचे संचालक गायकवाड यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.

शाहूवाडी तालुका कधीकाळी गोकुळला दूध पुरवठा करण्यात अग्रेसर होता. मात्र सद्या याच्या उलट परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी पुढे यावे, यासाठी संघाकडून शक्य तितके सहकार्य करण्याची ग्वाही अध्यक्ष डोंगळे यांनी दिली.
दरम्यान पशुधन सुरक्षा (विमा) योजने अंतर्गत नुकसानग्रस्त संबंधित पशुपालकांना धनादेश वाटप करण्यात आले. उपस्थितामधील काही दूध उत्पादकांनी व्यवसायातील अडचणींना अनुसरून संचालकांपुढे तक्रारवजा प्रश्न मांडले. याला संघाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देत दूध उत्पादकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

लम्पी स्किन रोगाच्या प्रतिबंधासाठी संघाची पशुवैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. तसेच संघाकडून जनावरांसाठी गरजेनुसार औषधं पुरवठा व्हावा. अशा अनेक अपेक्षित सुचनांना चेअरमन अरुण डोंगळे तसेच अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्या पाऊसमान कमी होत असल्याने जनावरांना पौष्टिक चारा वैरण मिळत नाही. साहजिकच दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. यासाठी दूध संघामार्फत सकस वैरण बियाणे २५ टक्के अनुदानावर पुरविले जाते. त्याचप्रमाणे व्यवसाय सुलभ आणि सुसह्य होण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. त्याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. रब्बी हंगामात शाळूचा पिकाची निवड करा. तसेच मका हे देखील जनावरांच्या आवडीचे खाद्य आहे. मुरघास तसेच कडबा कुट्टी साठवण्यासाठी सायलेज बॅगचा करावा, अशी पूरक माहितीही संघाच्या अधिकाऱ्यांनी सभेत दिली.

जेष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. अजित नरके, बाबासो चौगुले, मुरलीधर जाधव, अमर पाटील, एस. आर. पाटील, किसन चौगुले, बयाजी शेळके, आर. के. मोरे, अंजना रेडेकर, माजी उपसभापती महादेव पाटील, आदिनाथ भावके आदींसह बहुसंख्य दूध संस्थांचे चेअरमन संचालक, दूध उत्पादक सभेला उपस्थित होते. शेवटी आभार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मानले.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT