Latest

गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृता चौगुले

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गोदावरी खोर्‍याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. शिर्डी विमानतळाजवळ काकडी येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, तसेच आमदार राम शिंदे, सत्यजित तांबे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, किरण लहामटे व आशुतोष काळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, 'महानंदा'चे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'शासन आपल्या दारी' अभियानात अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी 30 हजार लाभार्थी आज उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात लाभार्थ्यांना 3 हजार 982 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन नगर जिल्ह्यातून होत आहे. जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृद्धी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे.

निळवंडेच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, 53 वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प शासनाने मार्गी लावला. पश्चिमीकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवून नगर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर असा पाण्यासाठी होणारा संघर्ष हटवून कुठेही दुष्काळ राहणार नाही, याची काळजी घेऊ. पावसाने ओढ दिली असली, तरी शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.

साखर कारखान्यांना बळ : पवार

राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

25 लाभार्थी व्यासपीठावर

मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात 25 लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. बबनराव गोविंदराव कबाडी (पुणतांबा, ता. राहाता), वैभव चंद्रकांत कांबळे (चिलेखनवाडी, ता. नेवासा), सौरभ दादासाहेब दौले (नेवासा), जया भास्कर पालवे (सावेडी, अहमदनगर), प्रफुल्ल भाऊसाहेब साळवे (राहुरी), हिराबाई ज्ञानदेव हळनूर (कुरणपूर, ता. श्रीरामपूर), बाळासाहेब नानासाहेब गव्हाणे (रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव), सुधाकर घोरकडे (मुंगी, ता. शेवगाव), पद्मा रोहिदास माळी (कोपरगाव), भारती दीपक वाडेकर (संगमनेर), संजय नानाभाऊ कडूस (सारोळा, ता. अहमदनगर), सीमा शब्बीर इनामदार (लोणी), मुक्ता अर्जन धोत्रे (बाभळेश्वर, ता. राहाता), गोरख बाबूराव शिंदे (येळवणे, ता. श्रीगोंदा), मिलिंद लक्ष्मण शिंदे (पिंपरखेड, ता. जामखेड), लक्ष्मण मोघा केदार (चिकलठाण, ता. राहुरी), राधाबाई मोहन देशमुख (अकोले), सुभाष त्रिंबक साळवे (शेवगाव), दानिश सलीम तांबोळी (माळीवाडा, नगर), योगेश जगन्नाथ घोलप, मोहिनी वीरेश पाचपुते (काष्टी, ता. श्रीगोंदा), अंबिका मल्हार (पारनेर), शकुंतला अरविंद आहेर व विष्णू लक्ष्मण शिंगटे (वाघोली, ता. शेवगाव) यांचा त्यात समावेश होता. सर्व लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

नगर ठरणार पहिला सोलर जिल्हा : फडणवीस

'शासन आपल्या दारी'च्या माध्यमातून तीन हजार 900 कोटी रुपयांचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाला आहे. जिल्ह्यात फक्त एक रुपयात 12 लाख शेतकर्‍यांचा पीक विमा उतरविला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कार्यक्रमात नगर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, कदाचित नगर हा पूर्णपणे सोलर होणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT