Latest

Goa Rain : मुसळधारेमुळे कुशावती नदीला पूर, मडगावला जाणारी वाहतूक वळवली

स्वालिया न. शिकलगार

मडगाव (गोवा) : पुढारी वृत्तसेवा – परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कुशावती नदीला पूर आला आहे. (Goa Rain) पारोडा रस्ता आणि पूल पुराच्या पाण्यात बुडाल्याने केपे ते मडगावला जाणारी वाहतूक असोल्डा आणि चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. (Goa Rain)

यंदाच्या पावसाळ्यात सलग चौथ्या वेळा पारोडा पुराच्या पाण्यात बुडाला आहे. गेले दोन दिवस दक्षिण गोव्यात पावसाने कहर केला आहे. सांगे तालुक्यातही संततदार सुरू आहे. त्याचा परिणाम साळावली धरणाच्या साठ्यावरही पडला असून जुवारी तसेच कुशावती नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. शुक्रवारी रात्री केपेच्या कुशावतीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे पारोडाचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. आमोणे ते पारोडा पुलही पाण्याखाली गेला आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पारोडा येथील मुख्य रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे ताबडतोब वाहतूक पोलिसांनी गुडी येथे बेरीगेट्स लावून मडगावला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पुराच्या पाण्याखाली गेलला पारोडा रस्ता

यंदा एकूण चार वेळा गुडी पारोडाचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. केपेतून मडगावला जाणारी वाहतूक चांदोर मार्गे वाळवण्यात आली असून चाकरमान्यांचे मात्र हाल झाले आहेत.

कुशावती नदी जुवारी नदीमध्ये विलीन होते. पारोडापर्यंत जुवारी नदीचे पाणी पोहोचते. येथे भरती-अहोटी येत असल्याने दुपारी पुराचे पाणी गावात आल्याची माहिती पारोड्याचे माजी पंच हेमंत खरंगटे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT