Latest

गोव्यातील विजयाचा मुंबईत जल्लोष, देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची भाजपकडून जंगी तयारी

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दिल्लीहून गोव्यावर स्वारी करण्यास निघालेले अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनी गोव्याची निवडणूक तशी रंगतदार केली आणि दोन जागा जिंकल्या. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष महाराष्ट्रातून युती करून गोव्याच्या मैदानात उतरले. या सर्वांना धोबीपछाड देत इथेही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता राखली. आता या विजयाचा जल्लोष आज शुक्रवारी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर पाहायला मिळत आहे.

मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्ते आनंदाने नाचत आहेत. ताशांच्या गजरात येथील वातावरण आनंदमय झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे थोड्याच वेळात मुंबईत भाजप कार्यालयात आगमन होणार आहे. कार्यकर्ते त्यांची प्रतीक्षा करत आहेत. भाजपचे गोव्यात विजय आणि मुंबईत सेलिब्रेशन सुरू असून यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत.

फडणवीसांची शिष्टाई यशस्वी

गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय गोव्याची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीची जबाबदारी प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. यानिमित्ताने गोव्यासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोव्यातील चाळीसही मतदारसंघात त्यांनी दौरे केले होते. दीड ते दोन महिने ते गोव्यात तळ ठोकून होते. पक्षातील अनेक अंतर्गत पेचप्रसंगामध्ये त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली. याविषयी ते म्हणतात, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा विजय गोव्यातील सर्वसामान्य जनतेचा आहे.

SCROLL FOR NEXT