Latest

Glenn Maxwell & Sharad Pawar : “मैदान क्रिकेटचं असो की राजकीय…” : रोहित पवारांची सूचक पोस्ट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्‍ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी (दि.७) ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात दमदार कामगिरी केली.जखमी असूनही त्‍याने एखाद्या लढवय्याप्रमाणे संघाला सामना जिंकून दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी २०१९ मधील शरद पवार यांचे पावसातील फोटो आणि ग्लेन मॅक्सवेलचा फोटो शेअर करत आपल्या 'X' खात्यावर एक सुचक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " 'योद्धा' जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं." (Glenn Maxwell & Sharad Pawar)

Glenn Maxwell & Sharad Pawar : मैदान क्रिकेटचं असो की राजकीय!

आमदार रोहीत पवार यांनी शरद पवार आणि ग्लेन मॅक्सवेलचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की,"परिस्थिती कितीही विरोधात असली. मैदानात 'योद्धा' जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते; मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं."

पाठीत आणि मांडीत वेदना आणि ग्लेन मॅक्सवेलचा झंझावाती खेळ

ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली. अफगाणिस्‍तान संघाने पहिला फलंदाजी करत 50 षटकांत गडी गमावून 291 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर 292 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंची अवस्था 18.3 षटकांत 7 बाद 91 अशी झाली होती; पण या पडझडीत मॅक्सवेलने संघासाठी झुंझार आणि अविश्वसनीय खेळी साकारून अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला. या खेळीदरम्यान मॅक्सवेल जबर जखमी झाला होता. त्याच्या पाठीत आणि मांडीत वेदना होत होत्या. पायांची हालचाल करता येत नव्हती. तो लंगडत धावत होता; पण तरीही एखाद्या लढवय्याप्रमाणे त्याने जागेवर उभा राहून चेंडू सीमापार धाडले. त्याने आपल्या स्फोटक खेळीदरम्यान 10 षटकार 21 चौकारांच्या मदतीने 128 चेंडूत नाबाद 202 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 293 धावा केल्या आणि सामना खिशात घातला.

Glenn Maxwell & Sharad Pawar : शरद पवारांची 'ती' सभा ठरली हाेती ऐतिहासिक

२०१९ मध्‍ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदारसंघातील निवडणूक राष्‍ट्रवादी काँग्रेसबरोबरच शरद पवार यांच्‍यासाठीही प्रतिष्ठेची ठरली होती. भाजपाकडून उदयनराजे यांना तिकीट जाहीर झालं. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले.  श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीची सभा साताऱ्यात होणारी होती.

सभेचा दिवस ठरला १८ ऑ्क्टोबर २०१९. साताऱ्यातील सभा सुरू व्हायला आणि पाऊस यायला एकच वेळ झाली.  ७९ वर्षाचे शरद पवार उत्साहात सभा घेत होते. यावेळी पवार म्‍हणाले हाेत की, "विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक ताजी आहे. एका दृष्टीने मी विचार करत होतो की. मी आज तुमच्यापुढे काय बोलावं. माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली की एखाद्या  माणसाकडून चुक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या उमेदवारी निवडीमध्ये  माझ्याकडून चुक झाली हे मी जाहीरपणे मान्य या ठिकाणी करतो; पण मला आनंद आहे की, ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील जिल्ह्यातील घराघरातील तरुण, वडीलधारी, सगळेजण 21 ऑक्टोबरची वाट बघत आहेत. २१ तारखेला  मतदानादिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो आमच्या दृष्टीने निर्णय घेतील."

ही ऐतिहासिक सभा उदयनराजेंना जखम देवून गेली…

शरद पवारांच्या भरपावसातील या सभेनंतर हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलं झालं. ७९ वर्षांच्‍या शरद पवारांच्या उत्साहाची आणि त्यांनी उदयनराजेंवर केलेल्या टीकेबद्दल चर्चा होवू लागली. शरद पवारांच्या भरपावसातील भाषणासारखी मतही अशी भरघोस मिळणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या. सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस पडू लागला. परिणामी या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजेंचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील लोकसभेवर निवडून आले. शरद पवार यांचे हे भाषण त्यांच्या पायाला जखम असताना भर पावसात केलं होतं. राजकीय वर्तुळात बोललं जावू लागलं शरद पवारांची ही ऐतिहासिक सभा उदयनराजेंना जखम देवून गेली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना 6,36,620 मते (51.04%) तर उदयनराजे यांना 5,48,903 मते (44.01%) मिळाली हाेती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT