श्रीनिवास पाटील
खासदार शरद पवार यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांत सर्वसामान्य नागरिकांत उत्सुकता व आदर आहे. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची व कारकिर्दीची बीजे ही त्यांच्या आईकडून झालेले संस्कार, त्यांनी घेतलेले प्रचंड कष्ट, कोणत्याही प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याची त्यांची तयारी, जोडलेला व जपलेला मित्रपरिवार आणि सातत्यपूर्ण अभ्यास यात आहेत.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्यानंतर दिल्लीत व देशात महाराष्ट्रातील नाव घ्यावे असे एकमेव नेते म्हणून
खा. शरदचंद्रजी पवार यांचा गौरवाने उल्लेख करावा लागतो. 1967 साली वयाच्या 27 व्या वर्षी आमदार, 32 व्या वर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री त्यानंतर शिक्षणमंत्री, कृषिमंत्री, उद्योगमंत्री, 18 जुलै 1978 साली वयाच्या 38 व्या वर्षी देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री, त्यानंतर पुढे तीनवेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते व केंद्रीय कृषिमंत्री अशा त्यांच्या जवळ-जवळ पन्नास वर्षांच्या कार्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांत त्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांत उत्सुकता व आदर आहे.
त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची व कारकिर्दीची बीजे ही त्यांच्या आईकडून त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांनी घेतलेले प्रचंड कष्ट, कोणत्याही प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याची त्यांची तयारी, जोडलेला व जपलेला मित्रपरिवार आणि सातत्यपूर्ण अभ्यास यात आहेत.
मी सन 1957 ला पुण्याच्या (शरद पवार वाढदिवस विशेष)
स. प. महाविद्यालयात दाखल झालो. 1958 साली इंटर आर्टस् शिकत होतो व माझ्या कॉलेजच्या गॅदरिंगचा जनरल सेक्रेटरी होतो. आम्ही पुण्यातील सातारच्या विद्यार्थ्यांनी 'संयुक्त सातारा मित्रमंडळाची' स्थापनाही त्याच वर्षी केली होती. शरदराव पवार 1958 साली बी. एम. सी. सी. महाविद्यालयात बारामतीहून शिक्षणासाठी आले व राज्याच्या ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संघटन बांधू लागले. त्या संदर्भात माझी त्यांची भेट आमच्या स.प.च्या होस्टेलमध्ये झाली. विद्यार्थिदशेपासूनच ते चव्हाणसाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले. मी तर चव्हाणसाहेबांच्या कराडचाच. चव्हाणसाहेबांचा प्रभाव लहानपणापासूनच माझ्या मनावर. त्यातच शरदराव पवार यांच्या दोन बहिणी ताई व माई माझ्या कराडच्या शेजारच्या गावातल्या सासुरवाशिणी. त्यामुळे पहिल्याच भेटीत आमचे धागे जुळले. होस्टेलवरून आम्ही दोघे धनाजीराव जाधवांना पुणे म. न. पा. समोरच्या त्यांच्या घरी भेटायला गेलो. पुढे विठ्ठल मणियार, चंदूशेठ चोरडिया, कर्नल संभाजी कणसे-पाटील, बाळ आग्रवाल असे अनेक मित्र होत गेले.
1958 साली जुळलेल्या या नात्याला 62-63 वर्षे कधी पूर्ण झाली कळलेच नाही. असे जिवलग मित्र, हजारो सहकारी आणि कार्यकर्ते सांभाळण्याचे काम साहेब आयुष्यभर करत आले आहेत. त्यांना अनेक क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था, कार्यकर्ते यांच्या नावासह माहिती असते. उत्तम व्यक्तिसंग्रह, कार्यकर्त्यांचे मन ओळखून प्रसंगी अनेकवेळा पदरमोड करून त्यांना दिलेले प्रोत्साहन मी अनुभवले आहे. कित्येकवेळा पायी, सायकल, मोटारसायकल, मोटार, हेलिकॉप्टर, विमानाने फिरून त्यांनी असंख्य लोक जोडले, त्यांना सांभाळले, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी झाले. कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, पत्रकारिता, उद्योग, आरोग्य सुविधा, कृषी, शिक्षण, सिनेमा निर्मिती इत्यादी क्षेत्रांतील त्यांच्या मित्रपरिवारासाठी त्यांनी वेळ दिला व आजही ते प्रेमाने त्यांची विचारपूस करतात, कलाकारांचा सत्कार करतात. मित्र जोडणे व मैत्री जपणे हे व्रत त्यांनी आजवर पाळले आहे.
काटेवाडीतील शेतातील वस्तीवरील घर व बारामती येथील आमराईतील घर, या दोन्ही ठिकाणी माझे 1958 पासूनच अनेेकवेळा जाणे-येणे व राहणे होते. बारामतीतील सहकारी खरेदी-विक्री संघात वडील कै. गोविंदराव पवार (आबा) नोकरी करीत. आई सौ. कै. शारदाबाई (बाई) शेती सांभाळत पवारांचा संसारगाडा कष्टाने, नेटाने व काटकसरीने चालवीत. 11 मुलांचा कुटुंबकबिला सांभाळत आबा व बाई यांनी आपल्या मुला-मुलींना हव्या त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील उच्चशिक्षण दिले.
वसंतराव थोरले चिरंजीव निष्णात वकील, दुसरे दिनकरराव बी. एस्सी. अॅग्री, पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून पदवी घेऊन शेती अधिकारी प्रवरा सहकारी साखर कारखाना येथे, तिसरेे अनंतराव उत्तम शेतकरी, नवनव्या साहित्याचे गाढे वाचक. चौथे माधवराव मेटर्लजी इंजिनिअरिंगचे इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन उद्योगात रमलेले, पाचवे सूर्यकांत ऊर्फ बाळासाहेब इंग्लंडमध्ये कार्यरत वास्तुविशारद. सहावे शरदराव बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज, पुणेमधून बी. कॉम. झाले.
सातवे प्रतापराव पुण्यातील सकाळ वृत्तसमूहाचे मुख्य, बहिणी माई जगताप या वडगाव हवेली (ता. कराड) येथील पुण्याच्या आर.टी.ओ. कार्यालयात वकील असलेल्या विष्णुपंत यांच्या पत्नी. दुसर्या सौ. सरोज या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, माजी सहकारमंत्री, रयत सेवक एन. डी. पाटील (दाजी) यांच्या सुविद्य पत्नी, तिसर्या सौ. मीनाताई जगधने, श्रीरामपूर मराठी साहित्य संमेलनात सामान्य रसिकांच्या गर्दीत सामावून जाणार्या रसिक आणि शेंडेफळ सौ. नीलाताई सासने, सर्वांना हव्याशा वाटणार्या आता पुणे मुक्कामी.
ओढगस्तीच्या संसारात पहाटे चार वाजता उठून मुलांचा जेवणाचा डबा एसटीने बारामतीहून पुण्याला रोज पोचवायचा. शेतीतील भाजीपाला, कडधान्ये बाजारात विकून मुलांच्या फीची व इतर शिक्षणासाठी लागणार्या खर्चाची सोय करायची हे अवघड काम आबा आणि बाई यांनी केले. कष्ट, जिद्द, सातत्य, न लाजता, न घाबरता जे काम हातात घेतले ते अखंडपणे चालू ठेवायचे. अपयशाने नाउमेद न होता, पुन्हा उभे राहायचे आणि 'एकला चलोरे' या निर्धाराने पुढे जायचे, हे बाळकडू बाईंच्या शिकवणीतून पवार मंडळींना आणि त्यांच्या घराला परिचित असणार्या मलाही मिळाले.
शरदराव पवार यांनी वयाच्या 17 व्या वर्षी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे निशाण खांद्यावर घेऊन कामास सुरुवात केली. अनेक समविचारी तरुणांना एकत्र घेऊन युवक काँग्रेसचा महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस म्हणून काम केेले. वयाच्या 27 व्या वर्षी बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 साली आमदार म्हणून ते निवडून आले. 1978 साली वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पुरोगामी लोकदलाचे नेते म्हणून शरदरावांनी शपथ घेतली. पाच सहकारी मंत्री यांचाही शपथविधी झाला होता. त्या शपथविधीला मी हजर होतो. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होते. पहिले पाच दिवस नव्या सहकार्यांना फारशी जबाबदारी न देता एकट्या शरदरावांनी दररोजचा प्रश्नोत्तरांचा तास ठरविलेल्या वेळी व ऐनवेळी पुढे आलेल्या सर्व विषयांवर एकट्याने तोंड देत सभागृह चालविले. राजकारणात मुरलेलेसुद्धा त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाची विधान मंडळातील कर्तबगारी पाहून चकित झाले.
विषयाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय शरदराव सभागृहात गेले नाहीत. लोकसभेत मी दहा वर्षे खासदार म्हणून त्यांच्यासोबत काम केले आहे. एखादे दिवशी ओळीने प्रश्नोत्तरांच्या तासात कृषी खात्याचे प्रश्न पाच किंवा सहा लागत व त्यांची पूर्ण समाधानकारक उत्तरे शरदराव देताना मी अनुभवले आहे. लोकसभेतील त्यांची चर्चेच्यावेळची भाषणे गाजायची. एखाद्या सभासदाने स्वत:च्या मतदारसंघातील एखादे काम सेंट्रल हॉलमध्ये बोलता बोलता त्यांना सुचविले किंवा लेखी त्यांच्या हातात दिले तर त्याबाबत राज्याच्या संबंधित खात्याच्या अधिकार्याला सूचना जात होत्या हे मी पाहिले आहे. विषय बटाट्याच्या, मिरचीच्या, कांद्याच्या, गव्हाच्या, भाताच्या, कापसाच्या, उसाच्या, कडधान्याच्या खरेदीबाबत किंवा मालाची खरेदीनंतर साठवण, अगर पेमेंटचा चेक मिळण्याबाबत असो, असे अनेक प्रश्न 24 तासांत सुटल्याचे व ज्याचा प्रश्न सुटला त्या सभासदाने मला सभागृहात किंवा सेंट्रल हॉलमध्ये त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करून घेतल्याने त्यांच्याविषयी आदर व कौतुकाचे उद्गार काढल्याचे मी ऐकले व पाहिले आहे. (शरद पवार वाढदिवस विशेष)
कोणत्याही विषयाचे पूर्ण व सखोल वाचन, मनन, चिंतन करून त्यावर सविस्तर मत योग्य शब्दांत मांडण्याची कला त्यांना स्वकष्टाने प्राप्त झालेली आहे. संबंधित विषयावर लिहायचे असल्यास साधनांची, संदर्भांची जुळवाजुळव, त्यावरील कथनाची, भाषणाची पूर्ण तयारी. भाषणाचे मुद्दे थोडक्यात लिहून काढण्याची हातोटी, लेख, कविता, लावण्या, अभंग, नाटक साहित्यातले अनेक प्रकार, विनोदी लेखनातले वाचलेले किस्से अनुभवलेले विनोद योग्य ठिकाणी भाषणात पेरण्याचे कसब त्यांच्याकडे आहे.
कार्यकर्ता, आमदार, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, परत मुख्यमंत्री, मग खासदार, मग नव्या युवा पक्षाचा प्रमुख व भारताचा कृषिमंत्री या भूमिका पार पाडणे आणि पक्ष स्थापनेपासून जून 1999 ते ऑक्टोबर 1999 या पाच महिन्यांत नव्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाची मान्यता मिळविणे, कार्यकर्त्यांना सांभाळणे, बळ देणे, देशभर फिरून नवा पक्ष वाढविणे, महाराष्ट्रात त्या पक्षाला सत्तेत स्थान प्राप्त करून देणे, अनेक नवीन तरुण आमदारांना मंत्रिमंडळात नव्याने संधी देऊन त्यांच्या शक्तीला, बुद्धीला खतपाणी घालून राज्यकारभार सतत चालविणे हे सोपे काम नव्हे. ते आदरणीय शरदरावांनी करून दाखविले. त्यासाठी त्यांच्या पाठीशी होते त्यांच्या आईंनी (बाईंनी) केलेले संस्कार, त्यांनी स्वत: घेतलेले प्रचंड कष्ट, कोणत्याही प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी, जोडलेला व जपलेला मित्रपरिवार सतत सांभाळण्याची क्षमता व सतत नवीन पुस्तकांचे वाचन, माहिती मिळविण्याची ओढ.
शरदराव यांचा आता सहस्रचंद्र दर्शन सोहळा होत आहे. पत्नी सौ. प्रतिभा वहिनी, कन्या सौ. सुप्रिया, जावई सदानंद, नात कुमारी रेवती, नातू विजय, सर्व पवार कुटुंबीय, सगेसोयरे, मित्र स्नेही, विविध पक्षांतील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, शाहीर, कलाकार, खेळाडू, भटके विमुक्त व अठरापगड जातींचे लोक यांच्या शुभेच्छा व त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो म्हणून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.