Latest

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत लेखी सूचना द्या : जिल्हाधिकारी शंभरकर

अविनाश सुतार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत १२ सप्टेंबर २०२२ रोजी खासदार, आमदार, मंदिर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील, तर लेखी स्वरूपात २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांना सूचना करावयाच्या असल्यास लेखी स्वरुपात eotemple@gmail.com व dpodpcslpur11@gmail.com या इमेलवर २६ सप्टेंबर २०२२ पर्यत पाठवाव्यात. तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची प्रत मंदिर समिती कार्यालय, तुकाराम भवन, पंढरपूर, पंढरपूर नगरपरिषद, मंगळवेढा नगरपरिषद, उपविभागीय कार्यालय अकलूज येथे अवलोकनार्थ उपलब्ध आहे. याठिकाणीही लेखी स्वरूपात सूचना देता येतील, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठया प्रमाणात भाविक येत असतात. त्याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार प्रमुख यात्रा भरतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करुन मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, शौचालये, विद्युत विकास, पालखीतळ विकास, चंद्रभागा नदी तीरावर दोन्ही बाजूस घाटाचे बांधकाम, वारी कालावधीत गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वीत करणे, आदी बाबींचा समावेश असणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांच्या सुचनांचाही विचार करण्यात येणार आहे, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे.
आराखड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास, पंढरपूर शहरातील विकास कामे, संत नामदेव महाराज स्मारक, संत चोखामेळा महाराज स्मारक, पालखीतळ विकास, प्रशासकीय बाबी इत्यादीचा समावेश करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT