Latest

जळगाव : गिरणा धरण सलग चौथ्यांदा शंभर टक्के भरले, १७५ गावांचा पाणी प्रश्न सुटणार

गणेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यातील सहा तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे. २०१९ पासून गिरणा धरण सलग चार १०० टक्के भरले असून, धरणाच्या आजवरच्या इतिहासात गत चार वर्षांपासून सलगपणे हे धरण १०० टक्के भरत आहे. धरण तयार झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या ५३ वर्षात हे धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक असलेले व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याने जुलै महिन्यातच नव्वदी गाठली होती. गिरणा धरणाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच गिरणा धरण जुलै महिन्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले होते. धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या दोन दरवाज्यातून २ हजार ४४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, धरणातील जलसाठ्यात आवक वाढल्यास धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न गिरणेमुळे सुटतो. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफुट असून, यातील जिवंत पाणीसाठा वगळून ३ हजार दशलक्ष घनफुट मृत साठा आहे.

या वर्षांमध्ये धरण १०० टक्के भरले…

गिरणा धरणाचे १९५५ मध्ये १९६९ मध्ये लोकार्पण करण्यात आले. १९७३ मध्ये गिरणा धरणात पहिल्यांदाच जलसंपन्न झाले. धरणाच्या ५३ वर्षाच्या काळात गिरणा धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे. १९७३ मध्ये हे धरण पहिल्यांदाच जलसंपन्न झाल्यानंतर १९७६ मध्ये पहिल्यांदाच १०० टक्के भरले होते. त्यानंतर १९८०, १९९४, २००४ ते २००७ सलग १०० टक्के भरले. त्यानंतर २०१९ पासून ते यंदापर्यंत हे धरण १०० टक्के भरत आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT