रत्नागिरी जिल्ह्यात वाळू उत्खननाला परवानगी; वाळूचे प्रति ब्रासचे दर होणार कमी! | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात वाळू उत्खननाला परवानगी; वाळूचे प्रति ब्रासचे दर होणार कमी!

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुंबई यांच्या जलसर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील जोग नदी-आंजर्ला खाडी, वाशिष्टी नदी-दाभोळ खाडी, शास्त्री नदी-जयगड खाडी व काळबादेवी खाडीपात्रातील हातपाटी व डुबीद्वारे पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खननासाठी परवानगी देण्यात आली आहे.

या खाड्यांमध्ये चिन्हांकित केलेल्या विना लिलाव परवान्यासाठी राखीव असलेल्या रेती गटातील रेती उत्खननासाठी पारंपरिक पद्धतीने डुबी/हातपाटीद्वारे वाळू व रेती उत्खननाचा व्यवसाय करणार्‍या स्थानिक व्यक्ती किंवा संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे वाळू उत्खननाला पुन्हा सुरुवात होणार असून वाळूचे दर कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खाडीपात्रातील रेतीगटांचा सविस्तर तपशील, विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभाग येथे उपलब्ध आहे. तसेच हातपाटी आणि डुबी रेती गटाचा सविस्तर तपशिल उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व खनिकर्म कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालय जुनी प्रशासकीय इमारत, तळमजला (खनिकर्म शाखा) येथे जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 31 मे 2023 पर्यंत अर्ज करावेत. वाळू उत्खननासाठी परवान्याची मुदत 9 जून 2023 पर्यंतच मिळणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. जयगड खाडीमध्येच ड्रेजरला गतवर्षी परवानगी मिळाली आहे. त्यांची मुदत अद्याप संपलेली नाही. अन्य ठिकाणी अद्याप ड्रेजरला परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

Back to top button