बर्लिन : पुढारी ऑनलाईन; जगभरातील नोकरकपातीच्या लाटेत आणखी एका कंपनीने गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केला. जर्मन सॉफ्टवेअर कंपनी SAP ने सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची योजना आखली आहे. या नोकरकपातीचा SAP मधील २.५ टक्के कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. नुकतीच IBM या तंत्रज्ञान कंपनीने ३,९०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. आता त्यापाठोपाठ सॉफ्टवेअर कंपनी SAP ने नोकरकपात जाहीर केली आहे.
ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा अशा दोन्ही सेवा ऑफर करणार्या वॉलडॉर्फ (Walldorf) ग्रुपने सांगितले की, त्याचा मूळ व्यवसाय मजबूत करण्यासाठी कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि टार्गेटेड रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम राबविण्याची त्यांची योजना आहे.
SAP कंपनीने त्यांच्या २०२२ मधील रिपोर्टमधून नोकरकपात केली जाणार असल्याचे म्हटले आहे. SAP कंपनीत जगभरात १ लाख २० कर्मचारी काम करतात. यातील ३ हजार जणांना कामावरुन कमी केले जाणार आहे. मेटा, ॲमेझॉन, गुगल, आयबीएम आणि मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे नोकरकपातीची घोषणा केली आहे. आता SAP नेही नोकरकपातीचा निर्णय जाहीर केला आहे.
या पुनर्रचनेमुळे २०२४ पासून वार्षिक ३००-३५० दशलक्ष युरोची बचत होण्याची अपेक्षा आहे, "जे धोरणात्मक वाढीच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीला चालना देण्यास मदत करेल", असे SAP ने म्हटले आहे. संपूर्ण २०२२ वर्षात SAP ला ३०.९ अब्ज युरो महसूल मिळाला आहे. जो आधीच्या वर्षापूर्वीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. तर ऑपरेटिंग नफा २०२१ च्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी होऊन ८ अब्ज युरोवर आला आहे.
हे ही वाचा :