Latest

Gaurai News : गौराई आली माणिक मोत्यांच्या पावलांनी..

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्युत रोषणाई, फुलांनी केलेली आरास….पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या सुवासिनींनी मनोभावे केलेली आराधना आणि मांगल्यपूर्ण वातावरणात सोन्याच्या पावलांनी गौरींचे गुरुवारी (दि. 22) दुपारी आगमन झाले. घरोघरी त्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. गणपतीनंतर गौरी आल्याने घरोघरी चैतन्य पसरले.
बाप्पाच्या आगमनानंतर  माहेरवाशीण गौरी येतात. आज त्या सोबत पाऊस घेऊन आल्या.  गौरींचा आज आणि उद्या मुक्काम आहे. सजावट, विद्युत रोषणाई व फराळांचे जिन्नस आणि हळदी-कुंकू समारंभ अशी घरोघरी सुवासिनींची लगबग सुरू होती.
सूर्योदयापासून ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने या कालावधीतच गौरींचे आगमन झाले.  घराच्या प्रवेशद्वारापासून ते गौरी आवाहन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढण्यात आले. हातात गौरी घेऊन आलेल्या भगिनींच्या पायावर दूध-पाणी घालून त्यावर कुंकवाने
स्वस्तिक काढण्यात आले. घरात प्रवेश करताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे सुवासिनींच्या हस्ते घरात आणून गौरी आवाहन करण्यात आले.  गौरींची पूजा आणि आरती करून फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सर्वांना धन-धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो, अशी प्रार्थना सुवासिनींनी गौरींकडे केली.  कुलाचारानुसार घरोघरी गौरीच्या पितळी तसेच शाडूच्या मुखवट्यांची पूजा करण्यात आली. काही घरांमध्ये खड्याच्या गौरींची प्रथा असते. त्यानुसार गौरी आवाहन करण्यात आले. महिलांनी सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो, अशी प्रार्थना केली. एकूण घरी विधिवत पद्धतीने गौरी आगमन झाले.

आज पंचपक्वान्नांचा बेत

पहिल्या दिवशी गौरी आवाहन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि. 22)  गौरी पूजन होणार आहे. माहेरवाशीण गौरींना 'महालक्ष्मी' असेही संबोधिले जाते. महालक्ष्मी पूजनाचा दिवस शुक्रवारी (दि.22) आल्यामुळे देवीचा वार आणि गौरी पूजन असा दुहेरी योग जुळून आला आहे. पुरणपोळीसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. तसेच विविध पदार्थ, फळे यांची आरास मांडण्यात येणार आहेत. दरवर्षी गौरी पूजनाच्या दिवशी पूजा आणि आरती केल्यानंतर गौरीला पुरणपोळी, कुरडई-पापड, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, लाडू, फराळ, वरण-भात, बटाट्याची भाजी अशा विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे यांचाही समावेश असतो. यानिमित्ताने सायंकाळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

शनिवारी जाणार गावाला

गौरी पूजनानंतर तिसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.23) गौरी गावाला जाणार आहेत.  प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे विधिवत  गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण दिले जाते.
आम्ही गौरी पूजनाला घरी प्रथा आणि परंपरेप्रमाणे गौरी आवाहन केले. त्यानिमित्ताने खास सजावटही करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपतीसह शुक्रवारी गौरी पूजन करणार आहे. यानिमित्ताने घरी चैतन्याचे वातावरण आहे.
– सुधा मधुकर भिंबार-पाटील 

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT