गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (दि.२५) सकाळी १० च्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (वय ३६) असे मृत शिपायाचे नाव आहे.
नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. आज माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नितेशची ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर येताच त्याने आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
नितेश भैसारे हा मूळ चंद्रपूर येथील रहिवासी असून पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीस घटनेचा तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितले.
अहेरी येथे राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी नेमणूक झालेल्या पोलीस शिपायाने आत्महत्या करण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी २० फेब्रुवारीला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली होती. आज माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायाने तेच पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली.
हेही वाचलंत का ?